महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा- पंकजा मुंडे रविवार, ०२ जुलै, २०१७
बीड : संपूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन कार्यक्षमपणे राबविले जात असून बीड जिल्ह्यानेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात शौचालय बांधून त्याचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

देवकृपा उद्योग समुहाच्यावतीने माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या 30 स्वच्छतागृहाचा लोकार्पण कार्यक्रम श्रीमती मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार आर.टी. देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पंचायत समितीचे उपसभापती सुशिल सोळंके, माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस, देवकृपा उद्योग समुहाचे अप्पासाहेब जाधव, बाबुराव पोटभरे, तहसीलदार एन. जी. झंपलवाड, गटविकास अधिकारी श्री. गुंजकर यांची उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, केंद्र शासन देशात स्वच्छ भारत अभियान राबवित असून जिल्ह्यानेही प्रत्येक गावात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जनजागृतीपर मोठी चळवळ निर्माण केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येत आहेत. आपले गाव, आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. देवकृपा उद्योग समुहाच्यावतीने पवारवाडीमध्ये 30 स्वच्छतागृहे बांधून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील पदाधिकारी, सामाजिक संस्थांनी आपली सामाजिक बांधिलकी समजून या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला मदत करावे. तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटूंबाचे आरोग्य चांगले व निरोगी राहण्यासाठी शौचालय बांधून त्याचा वापर करावा. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करावेत.

शासन विविध विकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा फायदा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना झाला पाहिजे. यासाठी या योजना प्रशासनाबरोबर पदाधिकाऱ्यांनी या कामामध्ये पुढाकार घेवून योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोविला पाहिजे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. तसेच जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वत:चा उद्योग किंवा त्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी बचत गट तयार करण्यात येत आहे. याचा फायदा महिलांना होणार आहे. पवारवाडीच्या स्मशानभूमीसाठी व पाण्याच्या टाकीसाठी येणाऱ्या काळात निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

श्री. देशमुख यांनी सांगितले की, प्रत्येक गावात व प्रत्येक कुटूंबात शौचालय असणे आवश्यक आहे. माजलगाव तालुक्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात जवळपास 50 टक्के शौचालयाची कामे झाली असून येणाऱ्या काळात यामध्ये वाढ होणार आहे. शौचालय बांधकामासाठी शासनाकडून लाभार्थ्याला 12 हजार रुपयाचे प्रोत्सानपर अनुदान मिळणार आहे.

यावेळी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पवारवाडी येथील लाभार्थी नामदेव भगवान मोरे, भगवान तुकाराम मोरे, संगीता किशन गोरे व भारत तुकाराम शिंदे यांनी शौचालय बांधकाम करुन त्याचा नियमित वापर करीत आहेत. या लाभार्थ्यांना प्रत्येकी 12 हजाराचा धनादेश प्रोत्सानपर अनुदान म्हणून श्रीमती मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले. वाघ फाऊंडेशन, माजलगाव व पशू संवर्धन विभाग माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पवारवाडी येथे पशू रोग निदान व लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन नाईकनवरे, श्रीहरी मोरे, सरपंच अनुप घाटगे, संतोष यादव, विठ्ठलराव जाधव, आकाश खामकर, श्रीमती कविता जाधव, सुरेखा जाधव, मुंजाबा जाधव आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result