महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोकण भवन येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिन संपन्न मंगळवार, १७ ऑक्टोंबर, २०१७
नवी मुंबई : धन्वंतरी जयंतीनिमित्त आज विभागीय आयुर्वेद कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या आयुष विभागाने सन 2016 पासून धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या दिवसाचे या वर्षीचे घोषवाक्य Pain management through Ayurveda हे आहे.

या कार्यक्रमास कोकण विभाग उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, कोकण विभाग अपर कोषागार अधिकारी शरद जाधव, सहायक संचालक (आयुर्वेद) डॉ.व्यंकट धर्माधिकारी, संकल्प चित्र अधीक्षक अभियंता सुरेंद्र टोपले, प्रशासन अधिकारी मनोहर शिंदे आदि उपस्थित होते.

डॉ.मुळे म्हणाले की, आयुर्वेद शास्त्राचा उगम भारतात झाला असून नैसर्गिक आरोग्य रक्षण करणारी ही पद्धती आहे. या उपचारपद्धतीमुळे कोणतेही शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत. राष्ट्रीय आरोग्य दिनाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन घडविणे व लोकांना आजार होऊ नये यासाठी अगोदरच प्रबोधन करणे हा शासनाचा उद्देश आहे. आज मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.जाधव म्हणाले की, भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धती जगभरात ओळखली जाते. सध्या लोकांचा कल आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वाढत असून शासनाच्या या उपक्रमामुळे चला आयुर्वेदाकडे अशी लोकांची भूमिका नक्कीच होईल. आपण नेहमी आरोग्यम् धनसंपदा असे म्हणतो. त्यामुळे आपण प्रत्येकाने आरोग्य हेच खरे धन मानले पाहिजे.

श्री.टोपले म्हणाले की, सद्याच्या काळात जीवनमानातील बदलामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. यांत्रिक उपकरणामुळे शारिरीक कष्टाची कामे कमी झाली आहेत. आपण आयुर्वेदिक औषधांचा वापर केला पाहिजे. आजारी पडू नये हेच आयुर्वेद शास्त्राचा प्रयत्न असतो.

डॉ.धर्माधिकारी म्हणाले की, शासनाचा राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्याचा उद्देश हा आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार व्हावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे आयुर्वेदीय उपचार करण्याचे ज्ञान व कौशल्य आयुर्वेद चिकित्सकामध्ये व्हावे हा आहे.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस धन्वंतरी स्तवन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोज निंबाळकर यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result