महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सद्भावना एकता रॅलीसाठी सांगलीकर सज्ज शनिवार, १३ जानेवारी, २०१८
सांगली : सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवार, दिनांक 14 जानेवारी रोजी पुष्कराज चौक येथून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना एकता रॅलीसाठी जिल्हा प्रशासनाबरोबर सांगलीकर सज्ज झाले आहेत. रॅली मार्ग, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय पथक, स्टेडिअमवरील व्यवस्था अशी रॅलीची सर्व तयारी झाली आहे.

प्रशासनाच्या वतीने काढण्यात येणारी ही राज्यातील पहिली सद्भावना एकता रॅली आहे. हे आपलं शहर आहे. या शहरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आणि शांतता महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्व सांगलीकर नागरिकांनी या सद्भावना एकता रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही रॅली यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केले आहे. या रॅलीला विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवून ही रॅली यशस्वी करून समाजात दुही फैलावणाऱ्या समाजकंटकांना चोख संदेश देण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपायुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी रॅलीमार्गाची व स्टेडिअमची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी संयुक्त बैठक घेऊन महिला व विद्यार्थ्यांची कसलीही गैरसोय होणार नाही, यासाठी चोख नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

संपूर्ण रॅलीचा मार्ग 3 किलोमीटर 200 मीटर आहे. रॅलीमार्गावर कोणत्याही गाडीचा हॉर्न, सायरन वाजणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रॅलीमार्गामध्ये संदेशवहनासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे. तसेच, स्वयंसेवकाचीही मदत घेण्यात येणार आहे. रॅली सुरू होण्यापूर्वी फुगे सोडून शांततेचा संदेश देण्यात येणार आहे.

कॅमेऱ्यांची नजर

महानगरपालिकेच्या वतीने एकूण 17 कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील 3 सीसीटीव्ही कॅमेरे पुष्कराज चौक, शिवाजी स्टेडिअम आणि रिसाला रोड अशा महत्त्वाच्या ठिकाणी असणार आहेत. स्टेडिअमवर 6 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 हँडिकॅमेरेही असतील. तसेच, 2 इलेव्हेटेड कॅमेरे रॅलीमार्गासोबत असणार आहेत. पोलीस विभागाच्या वतीने संपूर्ण रॅलीमार्गावर ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर राहणार आहे. तसेच, 20 व्हिडिओ कॅमेरे असणार आहेत.

रॅलीचा मार्ग

दि. 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता सर्वांनी पुष्कराज चौकामध्ये एकत्रित जमायचे आहे. या चौकापासून ही रॅली सुरु होईल. ती राम मंदिर - पंचमुखी मारूती रस्ता - गरवारे महाविद्यालय - महानगरपालिका - राजवाडा चौक मार्गे निघून शिवाजी स्टेडियममध्ये रॅलीची सांगता होईल.

महानगरपालिकेची जय्यत तयारी

स्टेडिअमवर 30 x 15 मीटर स्टेजची उभारणी सुरू असून, ध्वनीक्षेपक व्यवस्था, फलक व्यवस्था लावण्याचे काम, तसेच, पाणी मारून स्टेडिअमची स्वच्छता करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने रॅलीमार्गावर ठिकठिकाणी 6 ठिकाणी तर शिवाजी स्टेडिअमवर 5 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 8 ठिकाणी फिरत्या शौचालयाची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था करण्यात आली आहे. 11 अग्निशमन वाहने आणि रूग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीच्या सुरवातीला, मध्ये आणि शेवटी अशा तीन रूग्णवाहिका रस्त्याच्या कडेला तैनात ठेवण्यात येणार आहेत. वैद्यकीय पथकेही ठेवण्यात आली आहेत. रॅलीमार्गावरील खड्डे भरण्याचे काम, गटर साफसफाई आदि बाबींचा बारकाईने विचार करून रॅली मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत राहण्याबाबत संपूर्ण नियोजन केले आहे. स्टेडियमवर 2 एल.ई.डी. स्क्रीनही लावण्यात येणार आहेत.

रॅलीसाठी चोख बंदोबस्त

रॅलीसाठी 500 पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि रॅलीमार्गावर वाहतुकीचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. वायरलेस यंत्रणा आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा यांच्या माध्यमातून रॅलीमार्गावर संदेशवहनाचे काम केले जाणार आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणेसाठी 4 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एका ठिकाणहून संपूर्ण रॅलीला संबोधित करता येईल.

3 ठिकाणी पार्किंग व्यवस्था

मिरजहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्केट यार्ड येथे, इस्लामपूरवरून येणाऱ्या वाहनांसाठी इमॅन्युअल स्कूल येथे आणि शहरातील अन्य वाहनांसाठी आंबेडकर स्टेडिअमवर अशा 3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतुकीचे नियोजन

रॅलीमार्गावर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले असून, वाहतुकीचा मार्ग सुरळीत राहील, याची खबरदारी घेण्यात आली आहे. पुष्कराज चौक ते राम मंदिर मार्गावरून रॅली मार्गक्रमण करेल. त्यामुळे राम मंदिर ते मार्केट यार्ड हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच, पुढील मार्गावरही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, रॅलीमार्ग हा रॅलीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

स्टेडिअमवर विद्यार्थी, पुरूष आणि महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडिअमवरील 6 प्रवेशद्वारे खुली ठेवण्यात येणार आहेत. स्टेजच्या पाठीमागील बाजूस आमराईच्या बाजूला केवळ परगाववरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

रॅलीसाठी विविध 16 ते 17 शाळांमधून विद्यार्थी येणार आहेत. रॅली मार्गक्रमणासाठी या सर्व शाळांचा क्रम ठरवण्यात आला आहे. सर्व विद्यार्थी गणवेशात येणार आहेत. प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांमागे नियंत्रणासाठी एक शिक्षक असणार आहे. तसेच, त्यांच्यावर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाचे अधिकारी देखरेख ठेवणार आहेत. विद्यार्थ्यांच्या खाऊ व पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, घरातून निघताना विद्यार्थ्यांनी सोबत गोळ्या, पाण्याची छोटी बाटली आणि टोपी घालून यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रॅलीच्या प्रारंभी राष्ट्रध्वज असणार आहे. त्यानंतर विविध वेशभूषेतील विद्यार्थी असणार आहेत. त्यानंतर पोलीस बँड, स्काऊट, गाईडचे विद्यार्थी, एन. सी. सी. चे कॅडेटस् असणार आहेत. त्यानंतर शाळांचे विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी आणि नागरिक असा रॅलीचा क्रम असणार आहे.

या सद्भावना एकता रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात, देशभरात, राज्यभरात शांतता, एकता, समतेचा संदेश सांगलीकरांकडून दिला गेला पाहिजे. आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत, ही भावना रूजण्यासाठी ही रॅली मदतीची ठरणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result