महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्राहकांच्या विजेबाबतच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील शनिवार, ०९ फेब्रुवारी, २०१९
जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक संपन्नअकोला :
ग्राहकांना वीज सेवा सुरळीतपणे मिळण्यासाठी त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज अकोला जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत केली.

अकोला येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार हरिष पिंपळे, महावितरणच्या अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदींसह समितीचे सदस्य व महावितरणाचे अधिकारी व विद्युत निरीक्षक याप्रसंगी उपस्थित होते.

दैनंदिन जीवनात वीज हा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे नागरिकांना वीज सेवा सुलभपणे द्यावी, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, विजेबाबतच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन समस्या जाणून घ्याव्यात. तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मदत कक्ष स्थापन करावा. वीज बिलाबाबत बहुतांश नागरिकांच्या तक्रारी असतात, त्या प्राधान्याने सोडवाव्यात. ग्राहकांना सरासरी बिल न देता मीटर रिडींगप्रमाणेच वेळेवर अचूक बिल द्यावे. पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी प्राधान्याने सुरळीतपणे वीज उपलब्ध करुन द्यावी. मूर्तिजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना सौभाग्य योजनेतून मीटर कनेक्शन तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वीजेमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा अहवाल बुधवारपर्यंत देण्याचे त्यांनी सूचित केले. तसेच अपघातप्रवण स्थळांच्या अंदाजपत्रकाचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याबाबत निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सौर कृषी पंपाची योजना अत्यंत महत्त्वाची व किफायतशीर असून या योजनेची जास्तीतजास्त प्रचार-प्रसिद्धी करावी. यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. अवैध वीज कनेक्शनबाबतही गांभीर्याने कार्यवाही करावी. तसेच अधिकाऱ्यांनी ग्राहकांना सौजन्याची वागणूक देण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

श्री.कछोट यांनी मागील बैठकीतील अनुपालनाच्या अहवालाची तसेच महावितरणाद्वारे राबविण्यात येणारे उपक्रम तसेच विविध कामांची यावेळी सविस्तरपणे माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result