महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कॉयर उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगाराची मोठी संधी - पालकमंत्री दीपक केसरकर शनिवार, २५ मे, २०१९


सिंधुदुर्गनगरी – नारळाच्या सोडणापासून काथ्या बनवणे हा एक मोठा उद्योग केरळ सारख्या राज्यात आहे. हा उद्योगास सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी शासनाने कॉयर धोरण तयार केल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी येथील माजगाव उद्यमनगर येथे ब्ल्यू डेल्टा उद्योग समूहाच्या यंत्र कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री
श्री. केसरकर बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, माजगावचे सरपंच दिनेश सावंत, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे राजेश कांदळगावकर, कॉयरचे राज्य मुख्य समन्वयक सुनिल देसाई, ब्लु डेल्टा उद्योग समूहाचे मालक गिरीष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


कॉयर उद्योग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा उद्योग होत असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नारळाची लागवड आहे. या नारळाची सोडणं कॉयर उद्योगापर्यंत पोहोचल्यास जिल्ह्यात हा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याची क्षमता या उद्योगामध्ये आहे. कॉयर उद्योगातून तयार होणाऱ्या उत्पादनास बाजारपेठ मिळावी यासाठी केरळच्या उद्योजकांशी चर्चा करण्यात येणार आहे. लवकरच जिल्ह्यात कॉयरचे टफटिंग युनिट उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये किमान दीड हजार महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे. कॉयर उद्योगासाठी चांदा ते बांदा योजनेतून 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उद्योजकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.


सुरुवातीस पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ब्लु डेल्टाचे मालक गिरीष चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील अनेक उद्योजक, माजगाव गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result