महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे मंगळवार, १२ मार्च, २०१९


पालघर : भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार लोकसभेच्या २२ - पालघर (अ.ज.) मतदारसंघात २ एप्रिल २०१९ रोजी अधिसूचना जारी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाने निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिले.

जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली. त्यावेळी डॉ.नारनवरे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ही निवडणूक तंत्रज्ञानावर भर देणारी आहे. विविध नवीन ॲपचा यावेळी वापर केला जाणार आहे. यामध्ये cVIGIL, सुगम, सुविधा, समाधान या ॲप सह १९५० या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधांना तातडीने प्रतिसाद देण्याबाबत आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत, त्यांचे पालन व्हावे. सिंगल विंडो सिस्टिम, लिगल सेल, माध्यम प्रमाणिकरण आणि मॉनिटरींग सेल, सोशल मीडिया मॉनिटरींग, उमेदवारांचा खर्च, भरारी पथके, शासकीय वाहनांचे जीपीएस ट्रॅकींग, बँकांमधून होणारे संशयास्पद व्यवहार, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सोयी सुविधा, कायदा व सुव्यवस्था आदी सर्व विषयांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

तत्पुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे यांनी मनुष्यबळाची उपलब्धता, त्यांच्या नियुक्त्या याबाबत सविस्तर माहिती दिली. उपजिल्हाधिकारी (सामान्य) डॉ.किरण महाजन तसेच उपजिल्हाधिकारी पांडुरंग मगदूम यांनी आचारसंहितेच्या पालनाविषयी मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देऊन शंकांचे निराकरण केले. कायदा व सुव्यवस्थेबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी तर, ॲपच्या वापराबाबत ऊर्जित बर्वे यांनी माहिती दिली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, सौरभ कटियार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, महसूल, पोलीस आणि अन्य संबंधित विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result