महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज- चंद्रकांत पाटील रविवार, ०३ मार्च, २०१९


बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेचे व घराचे उद्घाटन

शिर्डी :
महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगतानाच पारंपरिक बियाणे संवर्धनातून देशभर ओळख निर्माण केलेल्या राहिबाई पोपेरे यांचे कार्य सर्वांसाठी पथदर्शी आहे. गावागावात राहिबाई निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेच्या व घराच्या उद्घाटनावेळी श्री.पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, सरपंच शांताबाई पोपेरे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, अशोक भांगरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत, संदिप भुजबळ, शिवाजी धुमाळ, सुनिता भांगरे, बाजीराव दराडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, दुर्गम भागात पारंपरिक बियाणे संवर्धनाच्या कामामुळे राहिबाईंचे नाव जगभर झाले. स्वत:सोबतच परिसरातील महिलांना बरोबर घेऊन राहिबाईंनी केलेले पारंपरिक बियाणे संवर्धनाचे काम पथदर्शी आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात राहिबाईंनी बोलताना बीज बॅंक व घराची अडचण मांडली. राहिबाईंनी मांडलेली अडचण दूर करण्यासाठी त्यांना पर्यावरणपूरक बियाणे बँक उभी करुन दिली आहे. या बियाणे बँकेच्या माध्यमातून पारंपरिक बियाणांच्या संवर्धनासोबतच पारंपरिक बियाणांचा प्रचार व प्रसार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांचे आरोग्य, शिक्षण व महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी शासन कायम पाठिशी आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.

राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने भरीव निधी दिला आहे. राज्य शासनाने साडेचार वर्षांत अनेक सिंचन प्रकल्पाचे कामे केल्याने सिंचनाखालील क्षेत्रात आठ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, कोंभाळणे परिसरात 72 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची अडचण दूर होणार आहे. मोबाईल टॉवरचीही उभारणी करण्यात येणार असून त्यामुळे भ्रमणध्वनी सुविधा लवकरच मिळणार आहे. यासोबतच गावातील आवश्यक सोईसुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.



प्रा.शिंदे म्हणाले, दुर्गम भागात राहिबाईंनी बियाणे संवर्धनाच्या कामातून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळेच केंद्र शासनाकडूनही राहिबाईंच्या कार्याचा गौरव होणार आहे. राहिबाईंनी दुर्गम भागात सेवाभावी वृत्तीने केलेले काम नक्कीच दिशादर्शक ठरेल. कोभाळणे व परिसराला जोडणारे रस्ते व आवश्यक सोईसुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल.

श्रीमती पोपेरे म्हणाल्या, वीस वर्षांपासून पारंपरिक बियाणे संवर्धनाचे काम करत आहे. आज तीन हजार महिलांसोबत काम करते. पारंपरिक बियाणे संवर्धनासाठी आवश्यक बियाणे बँक व घरांची अडचण पुण्यातील एका कार्यक्रमात मांडली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या मागणीची तातडीने दखल घेत बियाणे बँक व घरांची उभारणी करुन दिली. याचा मला मोठा आनंद झाला आहे. या बियाणे बँकेच्या मदतीने पारंपरिक बियाणे जपण्याचे काम वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पाटील व प्रा. शिंदे यांनी बियाणे बँक व घरांची पाहणी केली व अवघ्या 36 दिवसांत बियाणे बँक उभारणीचे उत्कृष्ट काम केल्याबाबत समाधान व्यक्त केले.

प्रास्ताविक बायप संस्थेचे जतीन साठे यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result