महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
समाधान योजना मेळाव्याच्या माध्यमातून गरजू लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ - सदाभाऊ खोत शनिवार, ०१ जुलै, २०१७
सांगली : राज्य शासनाने सामान्य नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. समाधान योजना मेळाव्याच्या माध्यमातून हे काम होत आहे, असे प्रतिपादन कृषि व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.

महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत इस्लामपूर येथे आयोजित विस्तारीत समाधान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राजारामबापू नाट्यगृह येथे आयोजित या कार्यक्रमासाठी आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, वाळव्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार सविता लष्करे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

इस्लामपूर शहरातील रस्ते, कासेगाव पाणीपुरवठा, प्रस्तावित कृषि महाविद्यालय अशा अनेक विकास कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून परिसराचा चेहरा मोहरा बदलेल, असा विश्वास व्यक्त करून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, विस्तारीत समाधान योजना मेळाव्याच्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध प्रकारचे दाखले नागरिकांना मिळत आहेत. यामध्ये शिधापत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलिअर दाखला, आदिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र अशा अनेक दाखल्यांचा समावेश आहे. जनतेचे समाधान करण्याचा हा एक नाविण्यपूर्ण उपक्रम असून या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. भविष्यात मंडलस्तरावर, नगरपालिका क्षेत्रात, प्रभागस्तरावर असे समाधान मेळावे आयोजित करण्याचा मानस व्यक्त करून त्यांनी शासन शेतकऱ्याच्या बांधावर सुध्दा येईल, असे स्पष्ट केले.

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांसाठी घरकुल, महिला घरगुती गॅस जोडणी, बेरोजगारासाठी रोजगार उपलब्ध आणि नुकताच शेतकऱ्यांसाठी घेतलेला कर्जमाफीचा निर्णय असे अनेक जनहिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. वस्तू व सेवा करांच्या माध्यमातून संपूर्ण देश आजपासून एकाच कर प्रणालीत बांधला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप, रेशन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, मतदान ओळखपत्र, संजय गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, विविध बँकेकडील मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया, कृषि विभाग, उपअधिक्षक भूमी अभिलेख इस्लामपूर यांचेकडील दाखले वाटप करण्यात आले. शिक्षण विभागाकडील (पंचायत समिती वाळवा प्राथमिक विभाग) अपंग विद्यार्थ्यांना साहित्य, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रमाणपप वाटप करण्यात आले. विविध विभागाकडील 1 हजार 335 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र / लाभाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result