महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दुष्‍काळग्रस्‍तांच्‍या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - उपमुख्‍यमंत्री अजित पवार रविवार, १२ मे, २०१३
चित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अहमदनगर : राज्‍यात निर्सगाने निर्माण केलेले दुष्‍काळाचे मोठे संकट उभे आहे. हे संकट दूर करण्‍यासाठी दुष्‍काळग्रस्‍तांच्‍या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

अहमदनगर जिल्‍हयातील कर्जत, जामखेड व नगर तालुक्‍यातील विविध गावात दुष्‍काळ निवारणार्थ केलेल्‍या उपाययोजना मधील उभारण्‍यात आलेल्‍या जनावरांच्‍या छावण्‍या, रोजगार हमी योजनेच्‍या कामांना उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी भेट देवून तेथील शेतकरी व रोजगार हमी योजनेवर काम करणा-या मजूरांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांचे समवेत राज्‍याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री बबनराव पाचपूते, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष घनश्‍याम शेलार, जिल्‍हा परिषद सदस्‍य सर्वश्री  राजेंद्र फाळके,दत्‍ता वारे, जामखेडचे राष्‍ट्रवादी तालुका अध्‍यक्ष राजेन्‍द्र कोठारी, जिल्‍हाधिकारी डॉ. संजीव कुमार, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदि उपस्थित होते.

 

यावर्षी दुष्‍काळाची गंभीर प्रतिस्थिती राज्‍यात निर्माण झाली आहे. राज्‍यात 9 लाख जनावरे छावणीत दाखल झाली आहेत. यासाठी  शासन दररोज सुमारे 5 कोटी रुपये खर्च करीत आहे. जनतेला पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यासाठी 4500 पिण्‍याचे टॅन्‍कर सुरु आहेत असे सांगून उपमुख्‍यमंत्री अजित पवार म्‍हणाले की पशुधन जगविणे, पिण्‍याचे पाणी पुरविणे व हाताला काम देणे यासाठी शासन युध्‍दपातळीवर प्रयत्‍न करीत आहे. उष्‍णतेच्‍या तीव्रतेने भूगर्भातील पाण्‍याची पातळी खोल जात आहे. पाणी साठे कमी होत आहेत. भविष्‍यात पाण्‍याची टंचाई निर्माण होवू नये म्‍हणून कायम स्‍वरुपी उपाय योजना करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी सिमेंट नाला बांध, नालासरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, शिरपूर पॅटर्न व महात्‍मा फुले जलभूमी अभियानातंर्गत तलावातील गाळ काढणे या सारखी कामे प्राधान्‍याने करण्‍यात यावीतअसेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

 

दुष्‍काळासारख्‍या अडचणीच्‍या काळात जनतेला व शेतक-यांना दिलासा देण्‍याचे काम शासन करीत आहे. त्‍याला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करुन पाण्‍याचा काटकसरीने वापर करावा. शेतीसाठी ठिबक सिंचनाचा अधिक वापर व्‍हावा अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त करुन दुधाच्‍या दरवाढी संदर्भात शेतक-यांकडून मागणी होत आहे. दुध उत्‍पादन करणारे शेतकरी व ग्राहक या दोघांच्‍या हिताच्‍यादृष्‍टीने दरवाढीचा विचार केला जाईल असे ही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.

 

आज उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी कर्जत तालुक्‍यातील चिंचोली काळदात येथील जनावरांची छावणी, जामखेड तालुक्‍यातील डोणगांव येथील जनावरांची छावणी, महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्‍या कपार्ट बंडींगच्‍या  कामाची पहाणी, भुतवडा तलावातील गाळ काढण्‍याचा कामाचा शुभारंभ व जामखेड येथील जनावरांची छावणी, नगर तालुक्‍यातील चिंचोंडी पाटील येथील रोहयो कामाची पहाणी, जनावरांची छावणी व भातोडी तलावाची पहाणी करुन छावणीतील शेतकरी व रोजगार हमी योजनेवरील मजूरांशी सुसंवाद साधला.

 

यावेळी विक्रम पाचपूते, उपजिल्‍हाधिकारी (पूर्नवसन) गोरक्ष गाडीलकर,उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) राहुल पाटील,नगरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील,कर्जतचे उपविभागीय अधिकारी संदीप  कोकडे, जामखेडचे तहसिलदार विजय कुलांगे, जि.प.चे आरोग्‍य अधिकारी डॉ.के.आर.खरात, जि.प.चे जिल्‍हा पशुधन अधिकारी एस. तुंभारे विविध खात्‍याचे वरिष्‍ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

                                                                                    

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result