महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गावदेवी मैदानावर सुरु झाला आगळावेगळा महोत्सव सोमवार, ०१ मे, २०१७
  • कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते शुभारंभ
  • कोकणच्या आंब्यासमवेत मराठवाड्यातले धान्य देखील थेट विक्रीस
ठाणे : ठाणे जिल्ह्याने शेतकरी आठवडी बाजारांची मुहूर्तमेढ केली असून आता धान्यांची सुध्दा अशाच रितीने थेट विक्रीचा उपक्रमही सुरु करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे एक नवे पाऊलही आज टाकले आहे. दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवादरम्यान आता यापुढे धान्य महोत्सव भरविण्यास प्रोत्साहन दिले जाईल असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले . ते आज आंबा तसेच धान्य महोत्सवाचे उद्घाटन करतांना बोलत होते. ठाणे येथील गावदेवी मैदानावर हा महोत्सव सुरु झाला असून मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी ग्राहकांना बाजारभावापेक्षा स्वस्त धान्य देण्यासाठी स्टॉल्स स्थापले आहेत. संस्कार प्रतिष्ठान आणि नाम फाऊंडेशनने या महोत्सवाचे आयोजन केले असून कृषी व पणन तसेच सहकार विभागाचे सहकार्य मिळाले आहे.

आजपासून ४ मेपर्यंत धान्य महोत्सव आणि १० मेपर्यंत आंबा महोत्सव सुरू राहील अशी माहिती यावेळी देण्यात आली. विशेष म्हणजे जळगाव येथील महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम सकाळी आटोपून सदाभाऊ खोत हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी सहा - सात तासांचा प्रवास करून आले. त्यांनी या उपक्रमाबद्धल आमदार संजय केळकर यांना धन्यवाद दिले तसेच नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांचे देखील कौतुक केले. उद्घाटनानंतर मान्यवरांनी विविध स्टॉल्सची पाहणी केली तसेच मराठवाडा आणि कोकणातून आलेल्या शेतकरी व आंबा उत्पादकांशी चर्चाही केली, त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.

कोकण विकास प्रतिष्ठान दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करीत असते. त्याला जोडूनच ‘एक पाऊल बळीराजासाठी’ ही चळवळ नव्याने उभारण्यात येत असून यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, चवळी, तूरडाळ अशी अनेक धान्ये थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना खरेदी करता येतील अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. हे सर्व शेतकरी बीड, उस्मानाबाद भागातील असून त्यांचा माल थेट ठाण्यातील ग्राहकांना विकणार आहेत.

यावेळी बोलतांना मकरंद अनासपुरे म्हणाले की, अशा उपक्रमामधून शेतकरी आणि शेती जगेल आणि त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळेल. या महोत्सवात विविध जातींचे आंबे ग्राहकांना खरेदी करता येणार असून त्यांची माहितीही शेतकऱ्यांकडून घेता येणार आहे.

या ठिकाणी देवगड, रत्नागिरी, पावस, राजापूर, सिंधुदुर्ग येथील आंबा उत्पादकांचे स्टॉल्स असून आंबा पोळी, फणस पोळी, लोणची, पापड, मुरंबे, आवळा, कोकम सरबतदेखील ठेवण्यात आली आहेत. आजच्या उद्घाटनप्रसंगी मकरंद अनासपुरे, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे, जिल्हा कृषी अधिकारी प्रफुल्ल बनसोडे तसेच कृषी, सहकार व पणन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result