महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
केळझरचा विकास आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी शैलेश नवाल सोमवार, ०६ मार्च, २०१७
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर हे गाव दत्तक घेतले असून गावाच्या संपूर्ण विकासासाठी ग्रामविकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी यांचे अध्यतेखाली केळझरच्या विकास आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला डॉ. पंकज भोयर, सेलू तहसीलदार रवींद्र होळी, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक इलमे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेभुर्णे, केळझरचे सरपंच उपस्थित होते.

विदर्भातील अष्टविनायकापैकी एक वरदविनायक म्हणुन केळझरच्या गणपतीची ओळख आहे. जागृत गणेश मंदिर आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द आहे. जानेवारी पौष संकष्ट चतुर्थीला येथे एक दिवसाची यात्रा भरते तसेच गणेशोत्सव दरम्यान विर्दभातील भाविक या वरद विनायकाच्या दर्शनाला येत असतात. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कोटी रुपये प्राप्त होणार असून त्यासाठी नियोजनबध्द विकास आराखडा तयार करताना केळझर गणपती मंदिराच्या‍ आसपासचा परिसर, पथदिवे, सोलर पॅनल, पाण्याची व्यवस्था आणि रस्ते यांचा समावेश करावा. दत्तकग्राम योजनेअंतर्गत सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, अशा पध्दतीने इमारतीचे बांधकाम करून त्याला ग्रामभवन असे नाव द्यावे. पाणीपुरवठा योजना ही चाळीस वर्ष जुनी असून पाईपलाईनची दुरुस्ती तसेच आणखी 50 हजार लीटर पाण्याच्या टाकीची व्यवस्था चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात यावी. तसेच गणपती मंदिराला लागून असलेल्या तलावातील गाळ काढून सदर तलावातून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.

गावातील अंतर्गत रस्ते तयार करताना त्या‍मध्ये दुभाजक तयार करु नये. केळझर मध्ये होणाऱ्या विविध उत्सवासाठी एकच मोक्याची जागा निश्चित करुन त्याच ठिकाणी सर्व उत्सव घेण्यात यावे. केळझर येथे विविध ठिकाणी पुरातन मुर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी एक संग्रहालय तयार करुन सर्व मुर्ती एकत्र ठेऊन त्यांचे व्यवस्थीत जतन करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. पीर बाबा टेकडीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण करावे. केळझर हे ‘क’ वर्ग पर्यंटन क्षेत्रात येत असल्यामुळे पर्यटन विकास कामासाठी 3 कोटी 85 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यातून होणारी विकास कामे जून 2017 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. तसेच कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी एनआयटीला नेमण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी बैठकीत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शहिद स्मारक ते बौध्द विहार पर्यंतच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करुन घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करुन द्यावा सदर प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करुन घेता येईल. तसेच केळझर येथे बसथांबा असूनही बऱ्याचदा बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे निर्देशनास आणून दिले याबाबत एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांनी याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result