महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ज्येष्ठ साहित्यिक गुरुनाथ नाईक यांना महाराष्ट्र शासनातर्फे मदतीचा धनादेश रविवार, ०१ ऑक्टोंबर, २०१७
श्री. नाईक यांनी मानले शासनाचे आभार

पणजी (गोवा)
: ज्येष्ठ साहित्यिक, रहस्यकादंबरीकार व पत्रकार गुरुनाथ नाईक यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ७५ हजार रुपयांचा धनादेश आज श्री. नाईक यांना प्रदान करण्यात आला. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण विश्वस्त निधीतून ही मदत देण्यात आली असून राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूरचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी हा धनादेश श्री. नाईक यांच्याकडे सुपुर्द केला.

रहस्यकथांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. नाईक यांनी दीर्घकाळ पत्रकारिताही केली आहे. गेली काही वर्षे ते गोव्यात स्थायिक झाले आहेत. अलिकडे वयोमानानुसार त्यांची प्रकृती बिघडली असून सध्या ते पणजी येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल माहिती मिळाल्यावर माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी त्याची दखल घेऊन श्री. नाईक यांच्या औषधोपचारासाठी पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधून मदत देण्याचे आदेश दिले. माहिती संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, माहिती संचालक (वृत्त-जनसंपर्क) शिवाजी मानकर यांनी याबाबतची कार्यवाही तातडीने करुन पत्रकार कल्याण विश्वस्त निधीमधून मदत देण्याची कार्यवाही केली.

रविवारी श्री. लळीत यांनी पणजी येथील इस्पितळात श्री. नाईक यांची भेट घेतली व त्यांना धनादेश सुपुर्द केला. श्री. नाईक यांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होऊन त्यांनी पूर्ववत साहित्यसेवा सुरु करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. नाईक यांनी मदतीबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result