महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीवर भर – पालकमंत्री मदन येरावार सोमवार, २१ जानेवारी, २०१९


पोस्टल ग्राऊंड येथे रोजगार मेळावा

यवतमाळ :
भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील ७० टक्के लोकसंख्या ही २५ ते ३५ या वयोगटातील आहे. हिच देशाची खरी ताकद आहे. देशातील युवक-युवतीच्या हाताला काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी कौशल्य विकास ही योजना राबविण्यात येत आहे. एकप्रकारे शासनाचा कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीवर भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

पोस्टल ग्राऊंड येथे दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान आणि शासकीय औद्योगिक संस्था यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, खासदार भावना गवळी, अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक पी.बी. हरडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख महेश सिडाम आदी उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, प्रत्येकाच्या अंगी विशिष्ट गुण असतात. या कलागुणांना विकसीत करण्यासाठी शासनाने कौशल्य विकास योजना आणली आहे. नोकरीशिवाय तरुण-तरुणींना व्यवसायाभिमुख करणे हा मुख्य उद्देश आहे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी युवकांनी रोजगारक्षम होणे गरजेचे आहे. कौशल्य विकासासंदर्भात शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. कंपन्यांनीसुध्दा रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच युवक-युवतींना कौशल्यपूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री म्हणाले, येथील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी उद्योगांना मुलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग, नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग, जिल्ह्यालगतचा समृध्दी मार्ग आदी दळणवळणाच्या सोयी जिल्ह्यात निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे येथील उद्योगांना चालना मिळेल. पर्यायाने भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना खासदार भावना गवळी म्हणाल्या, या रोजगार मेळाव्यामुळे मुलांचे भविष्य घडणार आहे. यापुढेही अशा मेळाव्यांचे आयोजन नियमित करण्यात येईल. कौशल्य विकास, दीनदयाल उपाध्याय आदी योजनांचा तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्षा कांचन चौधरी यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

सॅनेटरी नॅपकीन वाटपसंदर्भात वणी येथील महिला बचत गटाने उत्कृष्ट कार्य केल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होत्या.

 

चांगल्या गोष्टी नागपूरातच

कै. अप्पासाहेबांचा एक लेख खूप ठिकाणी शोधला असता तो मिळाला नाही पण हा दुर्मिळ लेख नागपुरात मिळाला. चांगल्या गोष्टी नागपूरातच मिळतात असा भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट व हास्यात उत्स्फूर्त दाद दिली.

 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result