महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात तोडगा काढणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवार, ०९ एप्रिल, २०१८
जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अभियान समितीची सभा
जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत

ठाणे :
जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळाले पाहिजेत यादृष्टीने कुठेही त्यांची अडवणूक होणार नाही हे आपण पाहिले पाहिजे. येणारा पावसाळा लक्षात घेऊन साथ रोग व इतर रोगांवरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा राहिल याची देखील काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

ते नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अभियान समितीच्या सभेत बोलत होते. आमदार सर्वश्री पांडुरंग बरोरा, रुपेश म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, भिवंडीचे महापौर जावेद गुलाम दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांची यावेळी उपस्थिती होती.

गरीब रुग्णांना पैशाअभावी चांगल्या उपचारांना मुकावे लागते. उत्पन्नाचे दाखले मिळण्यात त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी महसूल मंत्री, सचिव तसेच आरोग्य मंत्री यांच्याशी बोलणार आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, गरजू रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मिळाल्याच पाहिजेत यादृष्टीने महसूल विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागाने नियोजन करावे.

आरोग्यावर ८० टक्क्यांपेक्षा जास्त निधी खर्च
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस.सोनावणे यांनी सादरीकरण करून राष्ट्रीय आरोग्य अभियानात किती उद्दिष्ट पूर्ण केले त्याची माहिती दिली. ते म्हणाले की, यंदा ४० कोटीचा निधी प्राप्त झाला त्यापैकी ८० टक्के निधी खर्च झाला आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यात अतितीव्र कुपोषित १४० आणि मध्यम कुपोषित बालके ६५४ असल्याचे सांगितले. सिकलसेलच्या ४० हजार जणांच्या चाचण्या घेतल्या त्यात ६५ रुग्ण आढळले, दमा रोगाचे प्रमाण आटोक्यात आहे, जननी शिशु सुरक्षेत ९० टक्के मातांना सेवा दिल्या आहेत, त्याचप्रमाणे टेलीमेडिसीन मध्ये ठाणे जिल्ह्यातील ४५५ रुग्णांना फायदा मिळवून दिला असल्याचीही माहिती दिली. आशा सेविकांच्या ११६४ जागांपैकी ११०३ भरलेल्या असून उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे. ३५ हजार ४०७ गरोदर मातांची नोंदणी झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कुपोषणावर पूर्णत:मात करावी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्फी पाटील यांनी स्वाईन फ्ल्यू लसीचा योग्य साठा असल्याची माहिती दिली. १५०० पैकी ५०० लसी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना तर १००० लसी सामान्य रुग्णालयांत उपलब्ध आहेत, असे सांगितले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुपोषणाची समस्या पूर्णत: सोडविण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या. भिवंडीजवळील कोन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जमिनीचा प्रश्नही सोडवूत असे सांगितले. याशिवाय सर्व तालुक्याना शवागृह असावीत यासाठी त्याचे नियोजन करण्यास जिल्हा परिषदेला सांगितले.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न
यावेळी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न वाढत असून विशेषत: ग्रामीण भागात कुत्रे चावल्याची अनेक प्रकाराने होत आहेत याकडे पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष वेधले. ठाणे पालिकेचे अधिकारी डॉ. केंद्रे यांनी माहिती दिली की शहरात सुमारे ५२ हजार भटकी कुत्री असून ४४ हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरण शत्रक्रिया केल्याचे सांगितले. परंतु ग्रामीण भागात अशी काही व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याचीही गंभीर दाखल घ्यावी व त्याठिकाणी देखील निर्बीजीकरण केंद्र सुरु करता येईल का हे पाहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
या सभेपूर्वी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेने वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांचा पालकमंत्री तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आशा स्वयंसेविका वैशाली गांगुर्डे, सुशीला भंडारे, नीता चौधरी, त्याचप्रमाणे गटप्रवर्तक तेजश्री जाधव, आशा लडकू दिनकर, मीरा संजय जाधव, आरती मोरे, शोभा घोलप, उपअभियंता प्रदीप पाटील यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मासिक पाळी व्यवस्थापनात चांगले काम केल्यामुळे डॉ.तरुलता धानके यांनाही सन्मानित करण्यात आले.

यावेळी जागतिक परिचारिका दिनानिमित्त रोहिणी घुसे, सुजाता भोईर, विद्या शिंगोळे, उर्मिला गडकरी, नंदिनी पाटील,उज्ज्वला हमीने या परिचारिकांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच धसई, बदलापूर व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ तरुलता धानके यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result