महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पशुवैद्यकीय दवाखान्याची आय.एस.ओ. नामांकनासाठी घोडदौड गुरुवार, ०५ ऑक्टोंबर, २०१७
विशेष लेख

आय.एस.ओ. नामांकन मिळणे हे निश्चितच एखाद्या उद्योग, संस्था, कार्यालयासाठी भूषणावह असते. हे मानांकन उत्पादन किंवा वस्तू यांच्याविषयी गुणवत्तेची खात्री देणारे म्हणून मानले जाते. याचाच अर्थ एखाद्या उद्योग - व्यवसायात अथवा सेवा उद्योगात व्यवस्थापन पद्धत अथवा सेवा गुणवत्ता सांभाळताना आय.एस.ओ. मानांकन संस्थेने घालून दिलेल्या प्रमाणकानुसार त्या प्रक्रिया पद्धती अवलंबून त्या दर्जाप्रमाणे काम करता येते.

एखाद्या रुग्णालयाने हे नामांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना ते मिळणे आपल्याला नवे नाही पण ठाणे जिल्ह्यातील शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आय.एस.ओ.करण्याचे ठरवले आहे हे वाचून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने नामांकन मिळवण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.

या पशुवैद्यकीय दवाखान्यात महाराष्ट्रातील पहिले शेतकरी वाचनालय 15 ऑगस्टला सुरु झाले. तर आवारात पशुसंवर्धन विभागाचा ठाणे जिल्ह्यातील पहिला गांडुळ खत प्रकल्प याच ठिकाणी सुरु झाला. या पशुवैद्यकीय दवाखान्यात परिसरातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या गायी आणि म्हशींना बारा आकडी आधार कार्ड नंबरही देण्याचं ओळख देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. शेतकरी पहिले आपल्या गायी म्हशीला बारा आकडी नंबर मारुन आपल्या जनावरांची नोंदणी करतात अशी माहिती या दवाखान्याचे प्रमुख डॉ.दिलीप धानके यांनी दिली. जिल्ह्यातील पहिल्या गांडूळ खत प्रकल्पासाठी मेहर फार्म लेण्याद्री-जुन्नर,पशु पालक शेतकरी अनंता देसले, कृषी महाविद्यालय सरळगाव, रावे ग्रूप पारताळे यांनी मदत केली आहे. तर आय.एस.ओ नामांकनासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रायकवारे व ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे हे मार्गदर्शन करीत आहेत.

पशुसंवर्धन विभागाचे वतीने या ठिकाणी नियमीतरित्या पशुचिकीत्सा व वंध्यत्व निवारण शिबिरे घेतली जातात आणि पशुपालक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. शिबिरात वांझ गायी म्हशींची तपासणी व बैलांचे खच्चीकरण करण्यात येते. तसेच शेतकरी पशुपालकांना जंतनिर्मूलन औषधी व खनिज मिश्रण वाटप करण्यात येते.

सध्या पशुसंवर्धनात गोचिड व जंतनिर्मूलन ही दुग्धव्यवसायाची पहिली पायरी आहे. त्यामुळे गोठा व्यवस्थापन आदर्श असेल तर स्वच्छ दूध निर्मिती होऊ शकते असे सांगण्यात आले. अशा रितीने हा दवाखाना लवकरच जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा आणखी एक तूरा रोवेल अशी आशा केली तर चुकीची ठरणार नाही.

जीतेंद्र भानुशाली,
पत्रकार, शहापूर
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result