महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मीरा भाईंदरकरांना विविध सुविधांसाठी ७५ एकर जागा; जलद गतीने प्रक्रिया पूर्ण शनिवार, ०३ मार्च, २०१८
ठाणे : मीरा भाईंदरकरांना होळीची भेट म्हणून तब्बल ६०० कोटी रुपयांची बाजारमूल्य असलेली शासनाची ७५ एकर जागा विविध सुविधा विकसित करण्यासाठी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा भाईंदर येथील कार्यक्रमात केली. ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी कमीतकमी कालावधीत वेगाने प्रक्रिया केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे कौतुक केले. या जागा मंजूर विकास आराखड्यातील प्रचलित शासन धोरणानुसार देण्यात आल्या आहेत.

सप्टेंबर २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त मीरा भाईंदर महापालिका यांनी या जागा विकसित करण्यासंदर्भात त्या हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी विनंती केली होती.

ज्या २९ हेक्टर जागा महसूल व वनविभागाकडून पालिकेकडे आरक्षण विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत त्याची माहिती पुढीलप्रमाणे :

भाईंदर येथील (हे. आर ०.४०) बगीचा, भाईंदर येथील (हे. आर ७.९७) भाईंदर चौपाटी, नवघर येथील (हे. आर ३) दफनभूमी, राई मुर्धे येथील (हे. आर ०.६०) शाळा विस्तार, घोडबंदर येथील (हे. आर ०.०५) प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान, खारी येथील (हे. आर ०.६०) प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान, नवघर येथील (हे. आर १४) चौपाटी, घोडबंदर येथील (हे.आर १.६०) स्मशानभूमी, पेणकरपाडा येथील (हे. आर १.६२) बगीचा या जागा आरक्षण ज्या कारणासाठी आहे त्याच बाबी विकसित करण्यासाठी दिलेली असून त्यात बदल करावयाचा झाल्यास पालिकेला शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल त्याचप्रमाणे याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची काळजी पालिकेला घ्यायची आहे, असे जिल्हाधिकारी यांनी जागा हस्तांतरणाच्या आदेशात स्पष्ट केले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result