महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हाधिकाऱ्यांनी केली वाई व हिवरा येथील ‘जलयुक्त अभियान’ कामांची पाहणी शुक्रवार, २७ मार्च, २०१५
परभणी : जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत पूर्णा तालुक्यातील वाई व हिवरा गावात सुरू असलेल्या कामांना जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. के. दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषी अधिकारी आर. पी. देशपांडे आदी उपस्थित होते.

वाई येथे सिमेंट नाला बांधमधील गाळ काढण्याच्या कामाला व हिवरा येथील ओढ्याला श्री. सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली.

श्री. सिंह म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कामात लोकसहभाग महत्वपूर्ण असून ग्रामस्थांनी व शेतकऱ्य‍ांनी पुढाकार घेऊन ओढे-नाले व प्रकल्पातील गाळ काढून घ्यावा. शेतीसाठी हा गाळ अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. ओढे व नाले यातून निघालेला मुरूम पाणंद रस्ते तयार करण्यासाठीही वापरता येणे शक्य आहे. ओढे व नाले यांच्या खोलीकरणासाठी जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सिमेंट बंधारे गावातील शिवारातील मोठ्या नाल्यावर बांधण्यात यावेत. शिवारातील नाल्याच्या जवळील सर्व विहिरींचे पुनर्भरण करण्यावर भर देण्यात यावा. विशेष ग्रामसभांतून ग्रामस्थांमध्ये जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात जाणीवजागृती करण्यात यावी व अभियानअंतर्गत कामे करताना संपूर्ण गावाचे हित डोळ्यासमोर ठेवावे, असे निर्देशही श्री. सिंह यांनी दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result