महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील शनिवार, ०९ फेब्रुवारी, २०१९
वरूडमध्ये महाराजस्व अभियानाला मोठा प्रतिसाद 
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते शुभारंभअमरावती :
शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत अनेक योजना अंमलात आणल्या. विकासाचा हाच प्रवाह गतिमान करत आता 'पेरणी ते कापणी' असा पूर्ण कालावधी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला शाश्वत पाठबळ शासनाकडून मिळणार आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज वरुड येथे सांगितले.

वरुड येथे आयोजित कृषी विकास परिषदेत डॉ. स्वामिनाथन सभागृहात वरुड व मोर्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आयोजित महाराजस्व अभियानाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. त्याचे अध्यक्ष म्हणून श्री.पोटे पाटील बोलत होते. आमदार डॉ.अनिल बोंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ.स्मिता कोल्हे , विभागीय आयुक्त पीयूष सिंह आदी उपस्थित होते.

श्री.पोटे पाटील म्हणाले की, गरीब व वंचितांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराजस्व अभियान लागू केले. योजनेच्या भरीव अंमलबजावणीसाठी तरतुदीत लोकाभिमुखही बदलही केले. प्रधानमंत्री आवास योजनेत पट्टेवाटपाबरोबर 5 ब्रास वाळू आता मोफत दिली जाणार आहे. शासनाने शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेतले. जिल्ह्यात 1 लाख 52 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. भोगवटा 2 च्या जमिनींचे रूपांतर एकमध्ये केले. 16 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. अखंडित वीजपुरवठा, सोलर प्रकल्प, कृषिपंप, पांदणरस्ते, ग्रामसडक योजना यासह विविध पूरक व्यवसायांना चालना दिली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून खारपाणपट्ट्याचा कायापालट होणार आहे. जलसंजीवनी योजनेतून अनेक प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत.

उच्चविद्याविभूषित असूनही शहरात न थांबता मेळघाटात जाऊन आदिवासी बांधवांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या कोल्हे दांपत्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

विकासाचा समतोल : कृषी राज्यमंत्री

कापूस विदर्भात पिकतो पण पूर्वी कापड उद्योग विदर्भात नव्हते. हे लक्षात घेऊन शासनाने विदर्भात वस्त्रोद्योगाला चालना दिली, असे सांगून श्री. खोत म्हणाले की, विकासाचा समतोल साधण्याचे प्रयत्न शासनाकडून होत आहेत. सर्वत्र पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. शासनाने अपघात विमा योजनेत मदतीची रक्कम वाढविली. मोठी तूर, मूग खरेदी केली. भाजीपाला नियमनमुक्त केला. पीक विम्याची भरीव अंमलबजावणी केली. आर्थिक मागास प्रवर्गाला आरक्षण दिले. त्याचा लाभ भूमिहीन व अल्पभूधारक यांना होणार आहे. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

वरुड तालुक्यात 17 हजार नागरिकांना आयुष्यमान योजनेत कार्डवाटप झाले. त्याचप्रमाणे जीवनदायी आरोग्य योजना,मुख्यमंत्री सहायता निधी याद्वारेही उपचारांसाठी मदत केली जात आहे, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले. वरुड येथील संत्रा प्रकल्पामुळे संत्रा निर्यातीला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

दुष्काळग्रस्त भागात जाहीर मदतीचा पहिला हप्ता येत्या तीन दिवसांत, तर सन्मान योजनेचाही लाभ याच महिन्यात मिळेल. निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन मॉक पोलमध्ये सहभागी व्हावे, असे श्री.सिंह यांनी सांगितले.

कोल्हे दांपत्याचा सन्मान

मेळघाटात आदिवासी बांधवांसाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे यांना पदमश्री मिळाल्याबद्दल त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. पाणी फौंडेशनतर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावांच्या प्रतिनिधींचाही गौरव यावेळी झाला. 200 भूखंड पट्टेवाटपही यावेळी करण्यात आले. उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांनी प्रास्ताविक केले.

महोत्सवात शेतीसाठीच्या योजना व कृषी तंत्रज्ञान याबाबत माहिती देणारे अनेक कक्ष असून, महाराजस्व अभियानाला वरुड व मोर्शी तालुक्यातील अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result