महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- राहुल रेखावार शनिवार, २७ एप्रिल, २०१९



मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना आज होणार साहित्याचे वाटप

 

धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता 02- धुळे लोकसभा मतदारसंघात सोमवार 29 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचाराची मुदत आज सायंकाळी समाप्त झाली. एकूण 19 लाख 4 हजार 859 मतदार 1940 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठी मतदान केंद्रांवर 9700 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 1455 कर्मचारी राखीव असतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, परवानगी कक्षाचे नोडल अधिकारी संग्राम कानडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले, 02- धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 02- धुळे लोकसभा मतदारसंघात 9 लाख 93 हजार 903 पुरुष, 9 लाख 10 हजार 935 महिला, तर 21 इतर मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एक सखी मतदान केंद्र असेल. या मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी महिला असतील. त्यात धुळे ग्रामीणसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तर इमारत खोली क्रमांक 1, नूरनगर, धुळे शहरात उन्नती विद्यालय, देवपूर, पूर्व भाग, खोली क्रमांक 1, शिंदखेड्यासाठी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, उत्तर- दक्षिण इमारत, खोली क्रमांक 5 (दोंडाईचा बाजूकडून), मालेगाव मध्यसाठी आरम प्राथमिक विद्यालय, पूर्व- पश्चिम (दक्षिणेकडील बाजू) तळमजला, खोली क्रमांक 3, नवापुरा आवार, मालेगाव बाह्यसाठी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, टोकडे, बागलाणसाठी जिजामाता कन्या विद्यालय, पूर्व- पश्चिम इमारत, पश्चिमेकडील बाजू, खोली क्रमांक 3 हे मतदान केंद्र असेल.

 

तसेच दिव्यांग कर्मचारी असलेल्या मतदान केंद्रांमध्ये धुळे ग्रामीणसाठी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, हिंगणे, शिंदखेड्यासाठी जिल्हा परिषद मराठी विद्यालय क्रमांक 5, (पूर्व बाजू), दक्षिणोत्तर इमारत, खोली क्रमांक 4, तसेच शिंदखेड्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय क्रमांक 5, कन्या विद्यालय, पश्चिमेकडील इमारत, खोली क्रमांक 2, धुळे शहरासाठी शासकीय विद्यालय (गरुड स्कूल), खोली क्रमांक 1, बागलाणसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालेगाव मध्यसाठी शेख उस्मान (हकीम), हाजी शेख नगर, पूर्व प्राथमिक विद्यालय, इस्लामपुरा यांचा समावेश आहे.

 

धुळे लोकसभा मतदारसंघात क्रिटिकल मतदान केंद्रांची संख्या 45, तर संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 73 आहे. याशिवाय एकूण 181 मतदान केंद्रांचे थेट वेब कॉस्टिंग करण्यात येणार आहे. या मतदानासाठी 182 बस, 206 जीप, 69 टेम्पो ट्रॅव्हलरसह अन्य 220 अशी 677 वाहने आवश्यक आहेत. मतदानासाठी 3880 बॅलेट युनिट, 1940 कंट्रोल युनिट, 1940 व्हीव्हीपॅट देण्यात आले आहेत. तसेच 182 झोनल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार 28 एप्रिल 2019 रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना साहित्याचे वितरण करण्यात येईल. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना घेवून जाणाऱ्या वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. या वाहनांचे ट्रॅकिंग करण्यात येणार असून त्याचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षातून करण्यात येणार आहे.

 

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. मतदान जनजागृतीसाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले आहे. मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. मतदान केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, दिव्यांग मतदारासाठी वाहन व रॅम्पची व्यवस्था, उन्हापासून बचावासाठी सावली, पाणी, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईलसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करुन इतरांनाही सांगावे जेणेकरुन अन्य मतदारांना प्रेरणा मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी जीपीएस ट्रॅकिंग नियंत्रण कक्षाला भेट देवून पाहणी केली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result