महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्यचे ‘महामानवाला’ अभिवादन; विशेषांकाचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते प्रकाशन रविवार, ०८ एप्रिल, २०१८
वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘महामानवाला अभिवादन’ हा लोकराज्यचा एप्रिल महिन्याचा विशेषांक तयार करण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले.

सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे, दलित मित्र मधुकर कासारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी अविनाश रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंकज वंजारी, जात पडताळणी मुख्य संशोधन अधिकारी गौतम वाकोडे उपस्थित होते.

खासदार श्री. तडस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असामान्य आणि अव्दितीय व्यक्तीमत्व होते. देशातील गरीब, पिडीत, शोषीत, दलित, महिला, कामगारांसह सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केली असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची छाप आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ हा अंक अत्यंत वाचनिय आणि संग्रही ठेवण्यासारखा आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून या महामानवाला अनोखी आदरांजली वाहण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या विशेषांकामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम करण्यात आले आहे. लोकराज्यचा हा विशेषांक प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवण्यात आला असून जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result