महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सांगली जिल्हा परिषदेचे दिव्यांग मित्र अभियान दिशादर्शी- चंद्रकांत पाटील रविवार, ०६ ऑगस्ट, २०१७
सांगली : उपेक्षित, दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना संबंधित लाभार्थीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून दिव्यांगांसाठी सांगली जिल्हा परिषदेने सुरू केलेला दिव्यांग मित्र उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कडेगाव येथे दिव्यांग मित्र अभियान दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण साळुंखे, तहसीलदार अर्चना शेटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवीकांत आडसूळ व्यासपीठावर उपस्थित होते.

दिव्यांग मित्र अभियान हा एक अभिनव उपक्रम असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात 36 हजार दिव्यांग आहेत. त्यापैकी 16 हजार दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळाले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना अनेक अडचणी येत होत्या. दिव्यांग मित्र या अभियानामुळे या अडचणी दूर होणार आहेत. दिव्यांगांना आता त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही. त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी तपासणी होऊन प्रमाणपत्र मिळणार आहे. अशा उपक्रमांसाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी योगदान द्यावे. जळगाव येथील महाजन यांनी दिव्यांगासाठी सुरू केलेले स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अपंग महिला शिलाई केंद्र चाळीसगाव येथील उदाहरण दिले.

या शिलाई केंद्रासाठी आपण दोन बस उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग मित्र या उपक्रमातून दिव्यांगांची वेळ आणि आर्थिक बचत होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. देशमुख म्हणाले, दिव्यांग मित्र या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात दिव्यांगांची नोंदणी पूर्ण झाली आहे. आज दुसऱ्या टप्प्यात दिव्यांगांची तपासणी केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात त्यांना प्रमाणपत्र देऊन, शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. राज्य शासनाने यापूर्वी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 250 कोटी रूपये निधी दिला आहे. या योजना सौर उर्जेवर चालविण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रास्ताविकात दिव्यांग मित्र अभियानाची पार्श्वभूमी, उद्देश यांची माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result