महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांची वीजबिलातून मुक्तता करण्यासाठी उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर चालविणार – मुख्यमंत्री शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६
  • म्हैसाळ आणि टेंभू उपसा प्रकल्पाच्या विविध कामांचा शुभारंभ
  • महामार्गापलीकडील कामामुळे 6 हजार एकराचे क्षेत्र ओलिताखाली येणार
  • विजेचे सर्व फीडर, कृषि पंपाचे फीडर सौर उर्जेवर चालवण्याचा विचार
  • साखर कारखाने, शेतकऱ्यांनी सर्व ऊस शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे आवाहन
  • म्हैसाळ योजनेकरिता 1649 कोटी रूपये निधी प्राप्त
  • या माध्यमातून 60 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

सांगली :
उपसा सिंचन योजनांच्या वीजबिलाचा खर्च शेतकऱ्यास परवडत नाही. या योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने निधी देण्याची मागणी वारंवार होते. ही पार्श्वभूमी पाहता या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. विजेचे सर्व फीडर, कृषि पंपाचे फीडर सौर ऊर्जेवर चालवायचे आहेत. सौर पंप देण्याऐवजी संपूर्ण फीडर उर्जेवर देण्याची अभिनव योजना आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचा दुसरा टप्पा म्हणून उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर चालविण्याचा शासनाचा विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे टेंभू उपसा प्रकल्प व कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या म्हैसाळ योजनेच्या विविध कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, नुतन पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, दीपक शिंदे-म्हैशाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

टेंभू आणि म्हैसाळ योजनांची सुरुवात आम्ही केली व त्यांना पूर्णत्व देण्याचे कामही आम्हीच करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, म्हैसाळ उपसा सिंचन योजना जत तालुका टप्पा क्र. 6 अ अंकले, टप्पा क्र. 6 ब खलाटी, कवठेमहांकाळ तालुका आगळगाव जाखापूर उपसा सिंचन योजना, टेंभू उपसा सिंचन योजना कवठेमहांकाळ कालवा राष्ट्रीय महामार्गापलीकडील ओलांडा बांधकाम व त्यापुढील कालव्याचे काम, कवठेमहांकाळ कालव्यातील ढालगाव वितरिकेचे काम, खानापूर तालुका टेंभू प्रकल्प टप्पा क्र. 5 भूड येथील पंपगृहाची उर्वरित कामे आज पूर्ण ताकदीने सुरू केली आहेत. आता यापुढे निधीची कमतरता पडू देणार नाही. महामार्गापलीकडील कामामुळे 6 हजार एकराचे क्षेत्र ओलिताखाली येऊन 8 गावांना त्याचा लाभ होणार आहे. गेल्या दोन वर्षामध्ये टेंभू योजनेंतर्गत पंपांची क्षमता 25 टक्क्यांवरून 70 टक्क्यांवर नेली आहे. या माध्यमातून 100 कि.मी. लांबीच्या कालव्याचे काम झाले आहे. परिस्थितीनुरूप तात्काळ निर्णय घेऊन दुष्काळात या योजनांचे पंप चालविल्यामुळे नदी, नाले, ओढ्यांमध्ये पाणी वाहू लागले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

टेंभू योजनेचे पाणी उपसा करण्यासाठी विजेचा खर्च येतो. त्यामुळे हे पाणी घेणे शेतकऱ्यांना खर्चिक पडते. म्हणून या मौल्यवान पाण्याचा नियोजनपूर्वक वापर झाला पाहिजे. त्यासाठी सूक्ष्म सिंचन योजना तयार करून कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कसे घेता येईल, जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवता येईल, याबाबत येत्या काळात प्रयत्न करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या माध्यमातून फळबागा, बारमाही पिके यांना चालना मिळेल. तसेच, यापुढे ऊस शेती पाटाच्या पाण्याने करता येणार नाही. साखर कारखाने आणि शेतकरी यांनी सर्व ऊस शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासन मदत करायला तयार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी निधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान कृषि सिंचन योजनेंतर्गत ताकारी म्हैसाळ योजनेला सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने पाठवला होता. या योजनेकरिता 1649 कोटी रूपये निधी मिळाला आहे. आता लवकरात लवकर काम पूर्ण करावे. त्या माध्यमातून 60 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली, सिंचनाखाली आणून 2019 सालापर्यंत या योजना पूर्ण करून दुष्काळी भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टेंभू टप्पा क्रमांक 5 मधून घाट माथ्यावर पाणी पोहोचणार आहे. तसेच अग्रणी नदीही बारमाही होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जत पूर्व भागातील 42 गावांचा समावेश करण्याबाबत तसेच घाटनांद्रे-तिसंगी योजनेचे तांत्रिक कारणाने रखडलेले काम येत्या 4 महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले. राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी उभे असून दुष्काळामध्ये विविध माध्यमातून 20 हजार कोटी रूपयांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे. पीक विमा योजनेतूनही शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना, शिवस्मारक, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना यांचा आढावा घेतला. मराठा व धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सकारात्मकतेने आणि संवेदनशीलतेने सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कवठेमहांकाळ तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result