महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
माणुसकीच्या जाणिवा जागृत ठेऊन काम करावे लागते - परिवहन मंत्री दिवाकर रावते शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७
वर्धा बसस्थानकाचे 7 कोटी 7 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन
४ लक्ष ५० हजार रोजगार निर्मिती
भरतीमध्ये पारदर्शकता
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार
वर्धेतून तीन शिवशाही बस लवकरच सुरू


वर्धा : एक सामान्य माणूस म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास केला आहे. त्यामुळे या अनुभवाचा फायदा बसस्थानक आणि बसच्या परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडविण्यासाठी होत आहे. पण त्याचबरोबर महामंडळाचे पुरुष व महिला कर्मचारी आणि प्रवासी यांच्यासाठी काम करताना माणुसकीच्या जाणिवा जागृत ठेवून काम केले तरच होणारा बदल महत्वाचा ठरेल, असे प्रतिपादन परिवहन व खारविकास मंत्री दिवाकर रावते यांनी केले.आज वर्धा बसस्थानकाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

वर्धा बसस्थानक येथे बसस्थानकाचे पुनर्बांधणी, आधुनिकीकरण आणि नुतनीकरण कामाचे भूमिपूजन आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे हस्ते झाले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार अनिल सोले, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे, नगर परिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, वर्धा विभाग नियंत्रक राजेश आडोकार आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.रावते म्हणाले, परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. त्यामुळे महिलांना त्यांच्या गावातच नियुक्ती देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांची ओढाताण कमी होऊन कुटुंबाला वेळ देण्यासोबतच त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतील. पालकत्वाच्या भूमिकेतून काम करतो असे सांगताना ते म्हणाले महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही विचार केला आहे. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

राज्यातील बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीने होणारे बस्थानकाचे बांधकाम आता बंद केले आहे. राज्य परिवहन महामंडळच यापुढे सर्व बस स्थानक बांधणार आहे हे सांगताना ते म्हणाले 85 कोटीचे बस स्थानक राज्यात बांधणार असून त्यामध्ये 48 कोटींची बसस्थानके केवळ विदर्भात निर्माण होत आहेत. हा सर्व खर्च भांडवली खर्चातुन करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भातील सर्व जुने बसस्थानक रंगरंगोटी करून प्रवाशाना सुखद वाटतील असे करण्यात येणार असून यासाठी 3 कोटी 15 लक्ष 60 हजार रुपये निधीचे नियोजन केले आहे. याशिवाय 3 हजार प्रवासी निवारे बांधण्यात येणार आहेत.तसेच सर्व बसस्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी खाजगी संस्थांची नेमणूक केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

परिवहन महामंडळाची भरती आता पूर्णपणे पारदर्शक झाली आहे. 4 लाख 50 हजार लोकांना रोजगार दिला असून आणखी 16 लाख बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी केवळ लेखी परीक्षा घेऊन लगेच त्यांना निकाल देण्यात येत आहे. अनुकंपा तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या महिलांची शारीरिक चाचणी न बघता केवळ त्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
योजना ह्या जनता व कर्मचाऱ्‍यांच्या हिताच्या असल्या पाहिजेत हे सागतांना ते म्हणाले त्याचा फायदा 50 टक्के या पिढीला आणि 50 टक्के पुढच्या पिढीला मिळेल असा दुरदृष्टीकोन ठेवून नियोजन करण्यात आले आहे. कर्मच-यांना काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, तेव्हाच तो चांगल्या मानसिकतेने काम करेल. म्हणून रात्र पाळीत काम करणाऱ्या चालक व वाहकांसाठी बस स्थानकावर वातानुकूलित निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.

परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सांगूण ते म्हणाले,त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच मुंबईत बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये सुद्धा 25 टक्के जागा ठेवणार आहे. कर्मचा-यांचा आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटुंब सुरक्षा योजना सुरू केली आहे. मुंबईतील कर्मचऱ्‍यांसाठी 1 हजार घरे बांधून देण्याचे काम सुरू असल्याचे श्री.रावते यांनी सांगितले.

प्रवाशांचा लांबचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून काही जिल्ह्यात शिवशाही ही वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. वर्धेतही लवकरच वर्धा-पुणे, वर्धा-औरंगाबाद, हिंगणघाट-शिर्डी अशा तीन शिवशाही बस लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बसला प्रवाशानी चांगला प्रतिसाद दिल्यास 10 बसेस सुरू करण्यात येतील. वर्धा जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करू अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

खासदार रामदास तडस यावेळी बोलताना म्हणाले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामुळे आज वर्धेत आधुनिक बसस्थानकाचे भूमिपूजन झाले आहे. पण गावोगावी प्रवाशांसाठी प्रवाशी बस निवारे सुद्धा बांधून देण्यात यावेत अशी मागणी केली. देवळीलाही नवीन बस स्थानक बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी श्री.रावते यांचेप्रति आभार व्यक्त केले.

आमदार पंकज भोयर यांनी नवीन बस स्थानकांमध्ये पूर्वीच्या दुकानदारांना गाळे वाटप करताना प्राधान्य द्यावे.सेलू बस स्थानकाचा विकास आराखड्यास मान्यता द्यावी आणि वर्धेत शिवशाही बस सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी केली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे जिल्ह्यात विविध चांगल्या वास्तु बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ शकले नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाचे सुनिल गफाट यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शुभसंदेश यावेळी वाचून दाखवला.

वर्धा विभागाचे विभाग नियंत्रक राजेश आडोकार यांनी प्रास्ताविक केले. श्री बाभरे यांनी संचालन केले तर आभार वाहतूक अधिकारी श्रीमती सुतोने यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result