महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सामान्यांच्या समस्यांना वृत्तपत्रातून वाचा फोडावी - खासदार रामदास तडस शनिवार, ०६ जानेवारी, २०१८
वर्धा : वृत्तपत्रांनी शेतकऱ्यांची सकारात्मक बाजू वृत्तपत्रातून मांडून त्यांना शासनातर्फे न्याय मिळवून देण्याचे काम केले. सामान्य नागरिकांच्या अशाच समस्यांना वृत्तपत्रातून वाचा फोडावी, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज सामाजिक न्याय भवन येथे पत्रकार दिनी केले.

मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष दिनेश पाटील, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजिज शेख, साप्ताहिक साहसिकच्या संपादिका श्रीमती कोंटबकर यांची उपस्थिती होती.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजाविरुध्द लढण्यासाठी केसरी या वृत्तपत्रातून लेखनीव्दारे बंड पुकारला. त्यांच्या लेखनीची गरज आज समाजाला जाणवत आहे. शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवित असतात. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कामे वृत्तपत्रे सकारात्मक पद्धतीने करीत आहे. पत्रकारावर होणारे हल्ले यासारख्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही श्री. तडस म्हणाले.

वृत्तपत्रांनी प्रशासनाच्या नकारात्मक बाबींसोबतच सकारात्मक बाबींसुध्दा समाजासमोर मांडाव्यात हे सांगताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी वृत्तपत्रातून मांडण्यात येणाऱ्या चालू घडामोडी, ऐतिहासिक माहितीचा उपयोग चांगल्या प्रकारे होत असतो. ज्याप्रमाणे विदेशामध्ये वृत्तत्रामध्ये पहिले, शेवटचे आणि पेज थ्री पानावर सकारात्मक बातम्या दिल्या जातात त्याप्रमाणे आपल्याकडे वृत्तपत्रांनी अशी सुरुवात केल्यास यामध्ये स्पर्धा निर्माण होऊन सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे वाचकांचा संपूर्ण वृत्तपत्र वाचण्याचा वेळ वाचेल.

यावेळी पत्रकार संजय तिगावकर, प्रा.राजू गोरडे, साम मराठीचे सुरेंद्र रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. तिगावकर म्हणाले, ग्रामीण भागातील समस्या आम्ही वृततपत्रातून मांडत असतो. परंतु समस्या मांडल्यावर प्रशासन समस्यांची दखल घेत नाही. यामुळे वर्तमानपत्रावर अन्याय होत आहे. अशी खंत व्यक्त केली. सध्या पाणी टंचाईसारखा गंभीर विषय असून वृत्तपत्रातून यावर रोज बातम्या प्रसिध्द होत आहे. यावर प्रशासनाने दखल घ्यावी, असेही श्री. तिगावकर म्हणाले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे व डॉ. रुंदन राठोड यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पाटील, संचालन निलेश पिंजरकर व आभार अजिज शेख यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे, पत्रकार, संपादक, नागरिक व जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result