महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ॲनिमिया आजारावर रोटरीने महिलांमध्ये जनजागृती करावी - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन शनिवार, ०३ फेब्रुवारी, २०१८
ठाणे : ॲनिमिया आजारावर रोटरीने महिलांमध्ये जनजागृती करावी, असे उद्गार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी जिल्ह्यातील रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक 3145 च्या वार्षिक परिषदेच्या कार्यक्रम प्रसंगी काढले.

यावेळी सभागृहाला मार्गदर्शन करताना त्यांनी असे सांगितले की, रोटरी संस्था राष्ट्र निर्माणात सशक्त समजदार लोकांचा समूह बनविण्याचे काम करत आहे. रोटरी ही आज इंटरनॅशनल स्तरावर काम करीत आहे. या रोटरी संस्थेने अनेक आरोग्य विषयक सामाजिक कार्य केले आहे. जनतेने कोणत्याही संघटनेच्या माध्यामातून एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. रोटरीची कामे समाजाला प्रभावित करणारी आहेत. संस्थेच्यामार्फत सामाजिक काम करताना एक वेगळा प्रभाव पडतो. त्यांच्या कार्यामुळे विविध घटकांना आरोग्य विषयक विविध उपक्रमांची जाण निर्माण झाली आहे. एड्स बरोबर महिलांच्या काळजी घेण्यासाठी रोटरीने ॲनिमिया या गंभीर आजाराबाबत जनजागृती करताना सकस आहाराचे महत्त्व विषद करणे आवश्यक आहे.

विकासाचे मूळ मनुष्य सेवा
मनुष्य जीवन जगत असताना लोकांनी आपल्या आजूबाजूच्या चांगल्या गुणांचा विचार करुन एकमेकांना पुढे आण्यासाठी सत्कार्य करावे. जनतेने आपले काम करत असताना एकमेकास सढळ हाताने मदत केली पाहिजे. सरकारला आपण आपले कर नियमित भरले तर सरकारही आपल्या सोबत राहून उपलब्ध झालेल्या करातून आपणासं विविध सेवा पुरवू शकेल. सर्वांनी एकत्र येऊन नैसर्गिक पर्यावरणाबरोबर समाज मानवतेच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने शिक्षित होण्यासोबत स्वस्थ आणि मानसिक वातावरण कसे चांगले होईल याकडेही लक्ष्य देणे आवश्यक आहे. जनतेने काम करताना सामजिक संस्थेचा प्रत्येकाला फायदा होतो.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते परंतू आज यशस्वी पुरुषाच्या बरोबर स्त्री आहे. चांगले काम करत आपले जीवन सुखी करा चांगल्या कामासाठी इतराना प्रेरीत करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास सर्वश्री खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, रोटरीचे डिस्ट्रिक गर्व्हनर बी.एम.शिवराज, डिस्कॉन चेअरमन संदीप साळवी आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result