महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एमटीडीसीच्या व्होल्व्हो गाड्यांचे गणपतीपुळे येथे स्वागत शनिवार, ०८ डिसेंबर, २०१२
चित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्होल्व्हो गाड्यांमधून आलेल्या पर्यटकांचे गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन केंद्र परिसरात स्वागत करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी संतोष भिसे यांनी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एमटीडीसीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधायुक्त गाड्यांमुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना श्री.कांबळे म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला बाराव्या वित्त आयोगांतर्गत पर्यटन विकासासाठी मिळालेल्या साडेपाच कोटी निधीतून पाच सर्वसुविधायुक्त व्होल्व्हो गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. एका गाडीची किंमत एक कोटी 15 लाख रुपये आहे. या गाड्यांमध्ये केमिकल टॉयलेट, मिनी कॅन्टीन, आधुनिक पद्धतीची स्क्रीन असलेले टीव्ही, वायफाय कनेक्शन, टीव्ही, आदी सुविधा आहेत. कोकणातील निसर्गाच्या सान्निध्यात आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार असल्याने देशातील तसेच परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एमटीडीसीच्या या विशेष गाड्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मार्गावर डिसेंबर अखेरपासून धावणार असून एमटीडीसीच्या संकेतस्थळावर या गाड्यांच्या बुकींगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोकणात आपण प्रथमच येत असल्याचे सांगून सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, कोकण अत्यंत सुंदर आणि रमणिय आहे. इथल्या वेड्यावाकड्या वाटेतून प्रवास करताना सह्याद्रीच्या रांगेतील निसर्गाचे घडणारे दर्शन आनंद देणारे आहे. एमटीडीसीने अत्याधुनिक सुविधांनी युक्त व्होल्व्हो गाड्या उपलब्ध करून दिल्याने अधिक पर्यटकांनी या निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. पर्यटकांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गणपतीपुळे येथील सुंदर समुद्र किनारा, मंदिर परिसरातील स्वच्छता आणि शांतता पाहून खुप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक रवी पवार, व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक गजानन गवळी आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा
पालकमंत्री भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.
कोकणातील पर्यटन विकासाला अशा उपक्रमामुळे गती मिळणार असून पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल, असा विश्वास त्यांनी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढाा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result