महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील रविवार, २२ एप्रिल, २०१८
सांगली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी शासनाच्या विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. शासनाच्या विविध योजना व विकास कामाच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा शासनाचा मानस आहे, असे प्रतिपादन महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मिरज तालुक्यातील ढवळी येथे बोलवाड-वड्डी-ढवळी प्रमुख जिल्हा मार्ग 76 च्या सुधारणा कामाच्या भूमिपूजन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरूण राजमाने, दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी उपमहापौर शेखर इनामदार, पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कांबळे, प्राजक्ता कोरे, पंचायत समिती सदस्य सर्वश्री किरण बंडगर, त्रिशला खवाटे, दिलीप पाटील, ढवळी गावच्या सरपंच अश्विनी पाटील, वड्डीचे सरपंच अमीरून वजीर, बोलवाडचे सरपंच सुहास पाटील, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील, तहसीलदार शरद पाटील आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, गेल्या तीन-साडेतीन वर्षापासून मुख्यमंत्री महोदयांनी जे जे समाजामध्ये कमी आहे ते पूर्ण करत पुढे जाण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामध्ये रस्ते, गावामध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणे, वैद्यकीय सुविधा अशा विविध समाजातील उणिवा लक्षात घेवून त्या पूर्ण करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केल्यास, जनतेच्या समस्या जाणून घेवून काम केल्यास जनतेला मागणी करण्याची वाट पहावी लागणार नाही, असा मुख्यमंत्री यांचा मनोदय आहे व त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत. रस्ते झाल्याशिवाय लोकांची एकमेकांकडे ये-जा वाढणार नाही, व्यापार वाढणार नाही, शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये लवकर येणार नाही.

महाराष्ट्रामध्ये पीडब्ल्यूडीचे 89 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत यापैकी 57 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. भारत माला नावाची केंद्र शासनाची नवी योजना आली असून यामधून महाराष्ट्रात साडेसहा हजार किलोमीटर लांबीचे सहापदरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात ग्रामीण रस्ते 2 लाख 56 हजार किलोमीटर आहेत. यामधील 30 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येतील. या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामेही पूर्ण करण्यात येतील. शासनाच्या विविध योजना शिष्यवृत्ती, विविध कर्ज योजना, पिण्याचे स्वच्छ पाणी, उज्ज्वला गॅस योजना आदि विविध योजना घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार सुरेख खाडे यांनी मनोगत व्यक्त करताना मिरज तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते विषयक कामाची सविस्तर माहिती देवून वाडी-वस्तीवरील रस्त्यांची कामे करणे ही काळाची गरज असून यासाठी निधीची मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बोलवाड-वड्डी-ढवळी प्रमुख जिल्हा मार्ग 76 किमी 0/00 ते 12/00 ची सुधारणा करणे या एकूण 4 कोटी 68 लाख 41 हजार रूपये किंमतीच्या कामाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. स्वागत चंद्रकांत कुंभार यांनी केले. प्रास्ताविक विजय पाटील यांनी तर सूत्रसंचालन मुबारक सौदागर यांनी केले. आभार गजानन देशमुख यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result