महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक - रामदास आठवले शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८
सांगली : समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. समाजाची वैचारिक दिशा एकसंघ करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषद सांगली येथील वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती तम्मनगौडा रविपाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, माजी महापौर विवेक कांबळे, माजी उपमहापौर शेखर इनामदार, गोपीचंद पडळकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत विवाहित जोडप्यांना 50 हजार रूपये अनुदान दिले जाते. आंतरजातीय विवाह केलेल्या अनेक जोडप्यांची उदाहरणे देऊन समाजामध्ये परिवर्तन होत असल्याचे ते म्हणाले. मुलांनी घेतलेला निर्णय मान्य करून आई-वडीलांनी त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. सामाजिक ऐक्य व जातीभेद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन द्यावे, असे सांगून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.

स्वागत व प्रास्ताविक जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेबाबत व दिव्यांग नोंदणीबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद सांगलीच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 72 आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना समाजातील जातीभेद नष्ट करण्याच्या कामात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल प्रत्येकी पन्नास हजार रूपये अनुदान अदा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनी मनोगत व्यक्त करून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनीही मनोगत व्यक्त करताना त्यांना आलेल्या अडचणींचा खुलासा केला.

आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीकांत जोशी यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, आंतरजातीय विवाह केलेले दांपत्य व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result