महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्त शिवारअंतर्गतची प्रलंबित असलेली कामे 30 जूनपर्यंत पूर्ण करावीत- एम.डी. सिंह गुरुवार, २२ जून, २०१७
बीड : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गतच्या दुसऱ्या टप्प्यातील 256 गावामधील प्रलंबित असलेली जलसंधारणाची सर्व कामे 30 जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले की, शासनाने जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्याचा फायदा त्या गावांना झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्ह्यातील 256 गावांची निवड करण्यात आली असून या गावामध्ये यंत्रणेच्या माध्यमातून जलसंधारणाची विविध कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून ही कामे 30 जून अखेरपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत.

जलयुक्त शिवार योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील गावामध्ये जलसंधारणाच्या कामाचे उद्दिष्ट यंत्रणांना देण्यात आले असून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कामे पूर्ण झाली पाहिजेत. ज्या ज्या यंत्रणेची कामे पूर्ण झाली आहेत त्या कामाचे फोटो वेबसाईडवर वेळोवेळी अपलोड करणे आवश्यक आहे. पूर्ण झालेल्या कामाची पाहणी करुनच कामाचा निधी संबंधितांना वितरणाची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानातील हाती घेण्यात आलेल्या कामाचा गावनिहाय आढावा घ्यावा. प्रत्येक गावनिहाय एकूण कामे, पूर्ण झालेली कामे, प्रलंबित असलेली कामे, खर्च झालेला निधी, आवश्यक निधी, फोटो अपलोडींग आदी यंत्रणानिहाय कामाची संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडे असणे आवश्यक आहे, असेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result