महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वर्ध्‍याचा इतिहास देशपातळीवर नेण्‍याचे काम तरुण पिढीने करावे - खासदार रामदास तडस बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७
वर्धा : महात्‍मा गांधी यांनी इंग्रजांना भारतातून जाण्‍यासाठी चलेजावचा नारा दिला. त्‍याची बैठक वर्धा येथे झाली होती. याच आंदोलनात आष्‍टी येथील स्‍वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची बाजी लावून पोलीस चौकीवर कब्‍जा केला. आष्‍टीच्‍या स्‍वातंत्र्य लढयाचा इतिहास तरुण पिढीने देश पातळीवर पोहचविण्‍याचे काम करावे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

केंद्र शासन चलेजाव चळवळीचा अमृत महोत्‍सव देशभर साजरा करीत आहे. या निमित्‍ताने ``संकल्‍प से सिध्‍दी`` कार्यक्रमाचे जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात आयोजन करण्‍यात आले होते. त्‍याप्रसंगी खासदार श्री. तडस बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष नितीन मडावी, उपाध्‍यक्ष कांचन नांदूरकर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा जुहीकर, सभापती नीता गजाम, सोनाली कलोडे, जयश्रीताई गफाट, मुकेश भिसे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव उपस्थित होते.

9 ऑगस्‍टला चलेजाव आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्‍याच्‍या निमित्‍ताने केंद्र शासनाच्‍या वतीने 2022 पर्यंत देशाच्‍या प्रत्‍येक नागरिकांचा विकास करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात येत आहे. यासाठी जिल्‍हास्‍तरावर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी नागरिकांच्‍या विकासाठी संकल्‍प करावा. सर्व जाती धर्माच्‍या लोकांनी एकत्र येऊन देश महासत्‍ता बनविण्‍यासाठी संकल्‍प करण्‍याची गरज आहे, असे खासदार रामदास तडस म्‍हणाले.

प्रत्‍येक नागरिकांना स्‍वतःचे घर व्‍हावे ही इच्‍छा असते यासाठी केंद्र शासनाच्‍या वतीने 2022 पर्यंत प्रत्‍येक नागरिकाला स्‍वतःचे घर देण्‍यात येणार आहे. घर बांधण्‍यासाठी लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात बांधकामाची रक्‍कम थेट जमा करण्‍यात येणार आहे. देशातील भ्रष्‍टाचार कमी करण्‍यासाठी एक देश एककर अंतर्गत वस्‍तू व सेवा कायदा अंमलात आणला यामुळे देशातील भ्रष्‍टाचारावर आळा बसत आहे. जिल्‍ह्यातील नागरिकांना पार्सपोर्ट काढण्‍यासाठी नागपूर येथे जावे लागते. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन वर्धा येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्‍यासाठी परवानगी देण्‍यात आली असून लवकरच हे कार्यालय सुरु करण्‍यात येणार आहे, असे रामदास तडस यांनी सांगितले.

नितीन मडावी म्‍हणाले, राज्‍यातील सर्व जिल्‍हा परिषदांचे बळकटीकरण करण्‍याचा राज्‍य शासनाने निर्णय घेतला असून पंचायत राज व्‍यवस्‍थेमध्‍ये ग्रामीण भागाचा विकास करण्‍याचे ठरविले आहे. 2022 पर्यंत पर्यंत सर्व नागरिकांचा विकास करण्‍याचे दायित्‍व आपण स्वीकारले पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. यावेळी निता गजाम, कांचन नांदूरकर व विवेक इलमे यांची समायोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाला जिल्‍हा सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य, सर्व जिल्‍हा परिषदेचे खाते प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result