महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गावाच्‍या विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा- तहसीलदार तेजस्विनी जाधव सोमवार, ०४ सप्टेंबर, २०१७
वर्धा : शासनाला गावाचा विकास करण्‍यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपली जबाबदारी समजून समन्‍वयातून कामे केल्‍यास गावाचा तथा पर्यायाने जिल्‍ह्याचा विकास करण्‍यास मदत होईल, असे प्रतिपादन देवळीच्‍या तहसीलदार तेजस्विनी जाधव यांनी इंझाळा येथे गणेश उत्‍सवा दरम्‍यान संवाद पर्व या कार्यक्रामात केले.

जिल्‍हा माहिती कार्यालयाचे वतीने आयोजित देवळी तालुक्‍यातील इंझाळा येथे शिवगर्जना गणेश मंडळाचे सहकार्याने ‘संवाद पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बोराडे, कृषि सहायक रितेश कोरडे, वैद्यकीय अधिकारी संघर्ष राठोड उपस्थित होते. संवाद पर्वच्‍या माध्यमातून गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्‍यात येत आहे.

केंद्र व राज्‍य शासन ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहे. सर्व योजना आता शासनाने ऑनलाईन केलेल्‍या आहे. त्‍यामुळे आता नागरिकांना योजनांचा लाभ घेण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर जाण्‍याची गरज नाही. गावात असलेल्‍या आपले ई-सेवा केंद्रावर जाऊन विविध योजनासाठी ऑनलाईन अर्ज करता येते. नागरिकांनी शासनाच्‍या योजनांचा लाभ घ्‍यावा, असेही आवाहन तेजस्विनी जाधव यांनी केले.

श्रीमती सावळे म्‍हणाल्‍या की, आत्‍महत्‍याग्रस्‍त विधवासाठी बाळासाळेब ठाकरे स्‍वावंलबन योजना शासनाने सुरू केली असून शासनाच्‍या वतीने विधवा महिलांना ऑटो तसेच परमिट देण्‍यात येते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी शेती अवजारे बँक तयार तसेच अॅमिनो अॅसिड सारखे उद्योग उभारून बचत गटाचे आर्थिक उत्‍पन्‍न वाढवावे. गावातील तरुणांनी प्रमोद महाजन कौशल्‍य विकास योजने अंतर्गत कौशल्‍य हस्‍तगत करून स्‍वयंरोजगार उभारावा.

शेतकऱ्यांनी शेती पिकाचा विमा काढला असल्‍यास त्‍यांच्‍या पिकांचे नैसर्गिक आपत्‍तीत नुकसान झाल्‍यास 48 तासात नुकसानीची लेखी तक्रार कंपनीकडे सादर करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणुन फळबाग, भाजीपाला शेती करावी, असे रितेश कोरडे म्‍हणाले.

यावेळी डॉ. संघर्ष राठोड, श्री. बोराडे यांनी सुध्‍दा आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाला मंडळाचे सदस्‍य मयुर अवसरे, प्रकाश झांझडे, रामदास कोकाटे, गोपाल काळे,निलेश फरांदे, सचिन बरडे, सचिन होले, रवि डहाळे, पंकज तिवारी, चंद्रकांत पवार, पत्रकार हेंमत तुपकरी, चंद्रशेखर भेंडे, सचिन वडतकर, अमोल खोडे गावकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पंकज गादगे यांनी आभार उमेश वानखेडे यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result