महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्त शिवार अभियानाचा निधी खर्च करण्यासाठी 30 जूनची मुदत- प्रा. राम शिंदे शनिवार, ०६ मे, २०१७
जलयुक्त शिवार अभियानाचा तीन वर्षांचा घेतला आढावा
निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करण्याच्या सूचना

सांगली :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी राज्य शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी शेतकऱ्यांसाठी टंचाईवर मात करणाऱ्या जलसंधारण कामांसाठी खर्च व्हावा. तसेच, सन 2016-17 या आर्थिक वर्षातील या योजनेंतर्गतची कामे पूर्ण करण्याचा कालावधी संपला आहे. राज्य शासनाने ही कामे करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. तरी अभियानाशी संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करून युद्ध पातळीवर ही कामे पूर्ण करावीत, असे आदेश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियांतर्गत गेल्या तीन वर्षांतील कामांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, सर्वश्री आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, विलासराव जगताप, अनिल बाबर, मोहनराव कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जलसंधारण विभागाचे सहसचिव व्ही. एस. वखारे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पुणे विभागीय उपायुक्त (रोहयो) अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे आद उपस्थित होते.

या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी करताना हलगर्जी करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करावा. तसेच, कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत रक्कम जप्त करावी, असेही आदेश देऊन प्रा. शिंदे म्हणाले, सन 2017-18 साठी या अभियानांतर्गत प्रकल्प आराखडा तयार करताना संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावे टंचाईमुक्त होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी तहसीलदारांनी संबंधित विधानसभा सदस्य, लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.

श्री.खोत म्हणाले, सन 2016-17 ची प्रलंबित कामे पूर्ण करणे हे एक आव्हान आहे. या कामांना संबंधित यंत्रणांनी गती द्यावी. कारण ही कामे झाली नाहीत तर ती गावे या अभियानापासून वंचित राहतील.

यावेळी खासदार श्री.पाटील, उपस्थित सर्वश्री आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील कामांबाबत मौलिक सूचना केल्या.

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी प्रास्ताविकात गेल्या तीन वर्षात झालेल्या कामांची माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्षनिहाय सादरीकरण केले.

यावेळी गोपीचंद पडळकर, अधीक्षक अभियंता सुनील कुशीरे, कार्यकारी अभियंता सी. एच. पाटोळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्यासह जलयुक्त शिवार योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result