महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
खरीप हंगामात शेतकऱ्याला आवश्यक सुविधा द्या - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर बुधवार, ०४ जुलै, २०१८
सांगली : सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी मागणीप्रमाणे विनाविलंब पीककर्ज द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, उपायुक्त (महसूल) प्रतापराव जाधव, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक विलास काटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. त्याच्या कारणांचा आढावा कृषी विभागाने घ्यावा. बी-बियाणे, खते यांचा पुरेशा प्रमाणात साठा करून, मागणीप्रमाणे पुरवठा करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, शेतकरी बांधवांना पेरणीसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी बांधवांना समाधानकारक पीक कर्ज वाटप केले आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे अद्याप केवळ 25 टक्केच उद्दिष्ट गाठले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचित करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे तसेच कृषि विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि अनुषंगिक केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा डॉ.दीपक म्हैसेकर यांनी यावेळी घेतला. जलयुक्त शिवार योजना 2018-19 आराखडा उपविभागीय अधिकारी यांनी स्वत: आराखडा तपासून खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result