महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री मदन येरावार यांची शहीदांच्या कुटुंबि‍यांना सांत्वनपर भेट बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९


बुलडाणा :
राज्याचे अन्न व औषध प्रशासन, सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आज जम्मू व काश्मीर राज्यातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले गोवर्धननगर ता.लोणार येथील शहीद जवान नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

सर्वप्रथम त्यांनी शहीद नितीन शिवाजी राठोड यांना अभि‍वादन करुन श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी शहीद नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस करत शहीद नितीन राठोड यांचा मुलगा चि.पीयुष व मुलगी कु. प्राची यांना कुरवाळले. तसेच शहीद नितीन राठोड यांचा लहान भाऊ बंडु राठोड व वडील शिवाजी रामु राठोड यांच्याशी चर्चा करत शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केल्या जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दूबे, तहसीलदार सुरेश कव्हळे, एसडीपीओ श्री.व्यंजणे,बिबी पोलीस ठाणेदार श्री. खारडे, जि.प.सदस्य राजु इंगळे,सरपंच संजय चव्हाण,ॲड. नीलय नाईक,तसेच इतर राजकीय पदाधिकारी,अधिकारी व मान्यवर उपस्थ‍ि‍त होते.

शहीद अनिल वाघमारे यांच्या कुटुंबि‍यांना सांत्वनपर भेट
भारतीय लष्करात जम्मू काश्मीर राज्यात सियाचीन क्षेत्रात कर्तव्यावर असताना शहीद झालेले सावरगाव डुकरे ता. चिखली येथील शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. सर्वप्रथम त्यांनी शहीद अनिल वाघमारे यांना अभि‍वादन करुन श्रध्दांजली अर्पण केली. व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करत आस्थने विचारपूस सुध्दा केली. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी शासन राहील असेही यावेळी त्यांनी सांगितले.


शहीद जवान संजय राजपूत यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट
पालकमंत्री मदन येरावार यांनी आज जम्मू व काश्मीर राज्यातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद जवान संजय राजपूत यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. सर्वप्रथम त्यांनी शहीद संजय राजपूत यांना अभि‍वादन करुन श्रध्दांजली अर्पण केली. व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करत आस्थने विचारपूस सुध्दा केली.

यावेळी भेटीदरम्यान विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ.चैनसुख संचेती ,अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दूबे,उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर, शिवचंद्र तायडे,सुरेश संचेती,तसेच इतर राजकीय पदाधिकारी,अधिकारी व मान्यवर उपस्थ‍ि‍त होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result