महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जनतेची गाऱ्हाणी, पालकमंत्र्यांच्या कानी गुरुवार, २२ जून, २०१७
  • पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी साधला जनतेशी संवाद
  • नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश

सांगली :
माझ्या लेकराला शाळेत प्रवेश नाकारला आहे. साहेब, तुमच्याकडे मोठ्या आशेने आलोय... माझे कर्ज माफ करायचे आहे... गावच्या विकासासाठी पाणीपुरवठा संस्थेस अनुदान द्या... एक ना दोन, अशी अनेक गाऱ्हाणी... ही गाऱ्हाणी आस्थेने आणि जिव्हाळ्याने ऐकून घेत होते पालकमंत्री सुभाष देशमुख.

राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांसाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान, प्रधानमंत्री मुद्रा बँक कर्ज योजना, पीक कर्ज योजना, आरोग्य विभागाच्या योजना अशा अनेक योजना राज्य शासन जनतेसाठी राबवित आहे. या योजनांचा थेट लाभ मिळण्याबरोबरच जनतेच्या काही वैयक्तिक अडचणी नागरिकांना भेडसावत असतात. पालकमंत्री या नात्याने या समस्यांची सोडवणूक करण्याच्या नैतिक जबाबदारीतून श्री.देशमुख यांनी जनतेशी थेट संवाद साधायचा ठरवला आणि लगेचच त्याची अंमलबजावणी केली. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी जनतेच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

पालकमंत्री महोदयांशी अशा प्रकारे थेट संवाद साधण्याची संधी सांगलीकरांना प्रथमच मिळाली. ही संधी जागरूक आणि गरजू नागरिकांनी दवडली नाही. पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या उपस्थितीत नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. नागरिकांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी दिले.

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच त्यातील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने हा जनतेशी थेट संवाद हा अत्यंत अनोखा उपक्रम आहे. येणाऱ्या नागरिकांनी कोणतीही भीती, दडपण न बाळगता आपल्या समस्या पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यापुढे मोकळेपणाने मांडल्या. मौजे वाझर येथे गावठाण व स्मशानभूमी येथे पेव्हींग ब्लॉक, सिमेंट काँक्रिटीकरण करावे, कवठेमहांकाळ तालुक्यातील किसन शेळके यांच्या भूविकास बँकेचे कर्ज माफ करावे, पलूस तालुक्यातील अरविंद पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेस पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी 25 टक्के अनुदान मिळावे, वसंत चौगुले यांनी आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश नाकारल्याबद्दल दाद मिळावी, सुनील पारेख यांनी ठेवपावतीची रक्कम परत मिळावी, निवृत्तीवेतनसंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे यासारख्या समस्यांबरोबरच काही जणांनी व्यक्तिगत समस्याही मांडल्या. या सर्व अडचणींची तात्काळ दखल घेत, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी त्या उचित पद्धतीने सोडवण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

वसगडे येथील चंद्रकांत पाटील म्हणाले, मंत्रीमहोदय म्हटले की राजशिष्टाचार आला. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांना भेटता येत नाही. याउलट पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आमचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. त्यासाठी त्यांनी आम्हाला पुरेसा वेळ दिला. आमचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने बैठक लावण्याचे निर्देश दिले. असे यापूर्वी घडले नाही. पालकमंत्री एवढ्या आस्थेने बोलले, याचे आम्हाला आश्चर्य वाटले. असे पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले, हे आमचे भाग्य आहे.

याबाबत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शोभा मस्के म्हणाल्या, मी 31 मे 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. शिक्षण विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन कोषागार कार्यालयात सादर करायचे आहे. परंतु, मला अद्याप ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे मी सेवानिवृत्तीपासूनच्या सर्व लाभांपासून वंचित आहे. पालकमंत्री महोदयांनी माझी समस्या जाणून घेतली व पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याची ग्वाही दिली. याबद्दल मी पालकमंत्री महोदयांचे आभार मानते.

एकूणच पालकमंत्री महोदयांच्या या उपक्रमामुळे सांगली जिल्ह्यातील पिडीतांना, गरजूंना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result