महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वेळेत कामे न केल्यास कंत्राटदारांवर कारवाईचा जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांचा इशारा गुरुवार, ०९ नोव्हेंबर, २०१७
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानात वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे, त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकार नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे जास्त कामे घेऊन जाणीवपूर्वक काम करण्यास विलंब करणाऱ्या आणि पावसाळ्यापूर्वी कार्यादेश दिला असतानाही काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे पाणीसाठा न होण्यास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.

जलयुक्त शिवारबाबत नागपूर विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक वर्धा येथे प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, आमदार आशिष देशमुख, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्या.

प्रा. शिंदे म्हणाले की, नागपूर विभागात समाधानकारक कामे झाली आहेत. त्यामुळे दोन वर्षात 1789 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत हे या योजनेचे यश आहे. ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी जिल्ह्यांनी कामे केलीत. चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे नैसर्गिक आपत्तीमुळे थोडे माघारले असले तरी ते सुद्धा 31 मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करतील. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबवताना गाव हा घटक होता. पण यावर्षी 2017- 18 मध्ये पाणलोट क्षेत्र हा घटक ठरवून माथा ते पायथा काम करण्यात येणार आहे. यामध्ये 70 टक्के कामे ही माथ्यावर क्षेत्र उपचाराची असून 30 टक्के काम ही गावात होतील. यावर्षी 757 गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 21120 कामे प्रस्तावित केली आहेत. यासाठी 146 कोटी 65 लक्ष रुपये निधी नागपूर विभागाला वर्ग करण्यात आला आहे.

नागपूर विभागात 2015 -16 मध्ये 1077 गावांमध्ये जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या कामांमुळे 1 लक्ष 89 हजार 859 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्णण झाला असून त्यातून 1 लक्ष 9 हजार 108 हेक्टर क्षेत्राला दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यासाठी 494 कोटी 82 लक्ष रुपये खर्च झाला असून सर्व 1077 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच सन 2016-17 मध्ये एकूण 915 गावांपैकी 712 गावांमध्ये 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे 60 हजार 185 सहस्त्र घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून यातून 43 हजार 713 हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. यासाठी 334 कोटी 96 लक्ष खर्च करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result