महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन ही प्रत्येकाची जबाबदारी - विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
नवी मुंबई : पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन ही प्रत्येक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले. नागरी सेवा दिनानिमीत्त कोकण भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) प्रशांत बुरुडे, माजी अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपायुक्त (प्रशासन) शिवाजी कादबाने, उपायुक्त (विकास) रवींद्र शिंदे, उपायुक्त (पुरवठा) गीतांजली बाविस्कर, उपायुक्त (नियोजन) बा. ना. सबनीस आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, पंतप्रधान यांचे आजचे मार्गदर्शन हे आपणासर्वांनी ऐकून विचार करण्यासाठी आहे. आपण ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून गतिमान प्रशासन करणे अपेक्षित आहे. आपण प्रशासकीय सेवा करताना नागरिकाना तत्पर सेवा देणे अपेक्षित आहे.

श्री. देशमुख यांनी जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव असताना राबविलेले जलयुक्त शिवार अभियान, कृषि आयुक्त असताना सोयाबीनवर आलेल्या किडीवर सर्व्हेक्षण व उपाययोजना यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला, कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तेत वाढ होण्यासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. ते म्हणाले, आपण थोडी वेगळी वाट शोधून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजे.

कोकण विभागामध्ये सन 2016-17 मध्ये राबविण्यात आलेल्या “एक दिवस शाळेसाठी” या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आला व कोकण विभागातील लोकप्रतिनिधी व अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. जिल्हा परिषद शाळा डिजिटल शाळा झाल्या असून त्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. यावेळी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने राबविलेल्या एक दिवस शाळेसाठी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

श्री. गोयल म्हणाले की, प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे. नागरिकांना जे पाहिजे ते कसे चांगल्याप्रकारे देता येईल याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. सर्वसामान्य माणसासाठी चांगले काम करायचे आहे हे ध्येय मनात ठेवले पाहिजे.

श्री. चव्हाण म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील 23 नागरी सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून इंटरनेट बँकींग, मोबाईल ॲप व पीओएस प्रणालीद्वारे कॅशलेस कर भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने ई - गव्हरर्नसचा वापर सुरू केला आहे. याबाबत सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास कोकण भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result