महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
केमिस्ट असोसिएशनचे प्रश्न मार्गी लावण्यास कटिबद्ध- चंद्रकांत पाटील रविवार, ०६ ऑगस्ट, २०१७
सांगली : राज्यातील असोसिएशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील विटा येथे केमिस्ट असोसिएशनच्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, वैभव पाटील, केमिस्ट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष विजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

ॲन्टीबायोटीक रेझिस्टन्स या थीमवरील या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून श्री.पाटील म्हणाले, औषध विक्रीचा व्यवसाय करताना नफ्याबरोबरच ग्राहकांच्या समाधानाचा विचार होणे आवश्यक आहे. व्यावसायिक नफ्याबरोबर व्यवसायाचा दर्जा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेले पेशंट कौन्सिलिंग सेंटर, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यासारखे उपक्रम स्तुत्य आहेत. औषधावरील कर व परिषदेचे अन्य प्रश्न मार्गी लावण्यास शासन कटिबद्ध आहे.

आमदार श्री. शिंदे म्हणाले, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट ही देशातील मोठी संघटना आहे. या संघटनेचे राज्यभरात 72 हजार सभासद आहेत. मात्र या क्षेत्रात सध्या इंटरनेट फार्मसी या प्रणालीचे युवा पिढीला धोके आहेत. त्यामुळे या प्रणालीबाबत योग्य तो विचार व्हावा.

प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. सांगली जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष विनायक शेटे यांनी स्वागत केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result