महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मंगळवार, २१ मे, २०१९

जळगाव लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये तर
रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार


जळगाव - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 अंतर्गत 03-जळगाव लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये तर 04-रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल. यासाठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

लोकसभा निवडणूकीच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. ढाकणे म्हणाले की, जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 56.12 टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 61.40 टक्के मतदान झाले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातंर्गत येणाऱ्या जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा तर रावेर लोकसभा मतदार संघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर या विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. सर्व निवडणूक यंत्र महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षा कोठडीत सिलबंद करून ठेवण्यात आले आहेत. सीआरपी, एसआरपी आणि जिल्हा पोलीस दलाची तिहेरी सुरक्षा व्यवस्था याठिकाणी पुरविण्यात आली आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची 23 मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. मतमोजणीसाठी सहा कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षात 14 याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी 84 टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक, रो ऑफिसर, सुविधा कर्मचारी, टॅबुलेशन कर्मचारी, माध्यम समन्वयक व इतर सर्व कर्मचारी मिळून दोन्ही मतदार संघासाठी एकूण 1325 इतके कर्मचारी कार्यरत असणार आहे. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लक्ष ठेवणार आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अजयकुमार, रावेर मतदार संघाचे निरिक्षक छोटेलाल प्यासी जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम टपाली आणि ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 4024 टपाली तर 3899 सैनिकांचे मतदान प्राप्त झाले आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 2485 टपाली तर 1190 सैनिकांचे मतदान प्राप्त झाले आहे. टपाली मतदानाची मोजणी 10 आणि ईटीबीपीएस मतदानाची मोजणी 15 टेबलवर होणार आहे. दोन्ही प्रकारची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येईल. जळगाव शहर-29, जळगाव ग्रामीण-24, अमळनेर-23, एरंडोल-21, चाळीसगाव-25 व पाचोरा-24 तर रावेर लोकसभा मतदार संघात चोपडा-23, रावेर-23, भुसावळ-23, जामनेर-24, मुक्ताईनगर-23, मलकापूर-22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार आहे. मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक असेल. मतमोजणीच्या ठिकाणी भ्रमणध्वनी सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन येवू नये. मतमोजणीच्या परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पोलीस विभागामार्फत ठेवण्यात आला आहे. परिसरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी कर्मचारी यांचे वाहनासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नागरीकांना निकालाची माहिती मिळावी यासाठी परिसरात लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी सांगितले.
000

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result