महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्य मासिकाच्या विशेषांकातून महामानवाला अभिवादन - प्रा.रवींद्र ढाले शनिवार, ०७ एप्रिल, २०१८
लोकराज्य मासिकाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

सांगली :
लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त विशेषांक काढला होता. त्याचप्रमाणे डॉ.आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्तही विशेषांक काढला आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. लोकराज्यचा एप्रिल महिन्याचा विशेषांक हा महामानवाला अभिवादन करणारा आहे, असे प्रतिपादन प्रा.रवींद्र ढाले यांनी आज येथे व्यक्त केले.

सांगली शहर पोलीस ठाण्यात लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रोहीत चौधरी, आंबेडकर जयंती महोत्सवाचे अध्यक्ष ग्रॅबियल तिवडे, प्रा. राम कांबळे, सुरेश दुधगावकर, शाहीन शेख, प्रमोद कुदळे, नितीन गोंधळे, सुरेखा शेख, शुभांगी कांबळे, कुलदीप देवकुळे आदि उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असून, एप्रिलच्या विशेषांकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलूंवर मान्यवरांनी विचार मांडले आहेत. या विशेषांकांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे.

प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर म्हणाल्या, लोकराज्य हे मासिक महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असून, या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते. लोकराज्य मासिकाचा एप्रिल महिन्याचा विशेषांक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक आहे. या मासिकाचा खप साडेचार लाख प्रतींहून अधिक असून, देशातील सर्वाधिक खपाचे दुसऱ्या क्रमांकाचे हे मासिक आहे. या मासिकाची वार्षिक वर्गणी 100 रुपये आहे. तसेच, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे आपला आदर्श, आपली प्रेरणा महामानव हे पुस्तकही प्रकाशित केले असून, वर्षभरात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. दोन्ही पुस्तकांसाठी जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ए.एस.आय. शिवाजी भंडारे यांनी आभार मानले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, अनुयायी उपस्थित होते.

महामानवाला अभिवादन विशेषांकात मान्यवरांचे लेख

लोकराज्य मासिकाच्या महामानवाला अभिवादन या विशेषांकाचे अतिथी संपादक सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले असून, त्यांनी हक्क, अधिकार आणि दिले आत्मभान या लेखाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, या विशेषांकात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा सर्वांना समान न्याय, डॉ. जयसिंगराव पवार यांचा राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर, डॉ.शैलेंद्र लेंडे यांचा परिवर्तनाचे अग्रदूत, अविनाश चौगुले यांचा जलनीतीचे उद्गाते, डॉ.जी. एस. कांबळे यांचा ऊर्जाशक्तीला चालना यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंचा वेध घेणारे डॉ.संभाजी खराट, मिलिंद मानकर, डॉ.संदेश वाघ, प्रा.डॉ.म.सु.पगारे, यशवंत भंडारे, दत्ता गायकवाड, डॉ.अक्रम पठाण, प्रा.नागसेन ताकसांडे, डॉ.बबन जोगदंड, डॉ. विजय खरे, विष्णू काकडे, आदि मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result