महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूबाबत खबरदारी घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना बुधवार, ०५ जुलै, २०१७
ताप-सर्दीची लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवा

ठाणे
: आगामी गणेशोत्सव, दहीहंडी यासारख्या मोठ्या उत्सवांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता सर्व आरोग्य यंत्रणांनी घ्यावी. तसेच आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्दी-तापाच्या रुग्णांना चाचण्यांचे अहवाल येण्याची वाट न पाहता दुसऱ्या दिवसांपासून स्वाईन फ्लूचा औषधोपचार सुरु करावा, अशा सुचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

बुधवारी दुपारी ते जिल्हा परिषद येथे स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावाचा आणि उपाययोजनांचा आढावा घेत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणे जिल्ह्यात जानेवारीपासून आजपर्यंत २४२ रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे १३ रुग्ण दगावले असून ठाण्यातील ३ आणखी रुग्ण मुंबईत उपचारादरम्यान दगावले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील यांनी दिली.

विशेष म्हणजे यापूर्वी थंडीत “स्वाईन फ्लू’चा आजार झालेल्यांची संख्या वाढली होती. मात्र, ऐन उन्हाळ्यातही शहरात स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्यावरही ही साथ कायम आहे. यावर संशोधन सुरु असून दगावलेल्यामध्ये २ पुरुष, तर १४ महिला आहेत. त्यात १ महिला गरोदर होती. तसेच त्यातील १४ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाबासारखा आजार होता असे यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले.

मरण पावलेल्यांपैकी ९ जण ठाणे, २ कल्याण डोंबिवली आणि २ मीरा भाईंदर परिसरातील आहेत. ठाणे ग्रामीण भागात मात्र तुलनेने या रोगाचा प्रादुर्भाव नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणे यांनी दिली.

या रोगाच्या प्रादुर्भावाविषयी विभागीय समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश भागवत यांनी प्रथम सादरीकरण केले. ही साथ ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर तसेच वसई पालिका क्षेत्रात तुलनेने जास्त पसरली असून २०१६ मध्ये मात्र एकही मृत्यू झाला नव्हता. पण २०१५ मध्ये ठाणे, कल्याणच्या जोडीने नवी मुंबई, उल्हासनगरमध्येही मोठ्या प्रमाणावर साथ पसरली होती, असे त्यांनी सांगितले.

खासगी डॉक्टरांची देखील जबाबदारी

यावेळी पालकमंत्री श्री. शिंदे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना या रोगासंदर्भात अधिक सावध राहून उपचार करण्याचे व शासकीय आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेवण्याच्या सुचना दिल्या. ठाणे जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड आहेत व खाटांची पुरेशी संख्या आहे. ज्युपिटर व बेथनी तसेच इतर खासगी रुग्णालयांत अशी सोय आहे, इतर रुग्णालयांत देखील प्रसंगी असे वॉर्ड उभारण्याच्या सुचना द्याव्यात असे पालकमंत्री म्हणाले.

सर्दी ताप खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास लोकांनी घाबरून जाऊ नये. पण त्वरित आपल्या डॉक्टरना दाखवावे तसेच आरोग्य यंत्रणा, पालिका वैद्यकीय पथकांनी मोठ्या प्रमाणावर यासंदर्भात जनजागृती करावी. शाळा- महाविद्यालये, शिक्षक यांनाही यात सहभागी करून घ्या, म्हणजे त्याचा जास्त चांगला परिणाम होईल, असे ते म्हणाले.

टॅमी फ्लूच्या गोळ्याचा साठा पुरेसा राहील याची काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, तीव्र स्वरूपाच्या आजारात दिली जाणारी लस वेळीच उपलब्ध राहील यासाठी मी स्वत: आरोग्य मंत्र्यांशी बोलेल.

तपासणी केंद्रे पुरेशी

ठाणे जिल्ह्यात १३३ तपासणी ( स्क्रीनिंग) केंद्रे असून एकूण सर्व पालिकांमध्ये मिळून ५९ खाटा आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. त्यातील २६ खाटा आयसीयुमध्ये तर ६० व्हेंटिलेटर आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे, हाफकिन, मुंबई, कस्तुरबा रुग्णालय, मुंबई याठिकाणी तसेच ठाण्यातील इन्फेक्सन या खासगी प्रयोगशाळेत संशयित रुग्णांच्या घशातील द्रव चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सर्व पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

स्वाईनचा प्रभाव

  • एच१ एन १ चा प्रभाव मुंबई सर्कल मध्ये कसा वाढतोय :-
  • २०१४ मध्ये एकूण ६७ हजार ८३ रुग्ण तपासले त्यापैकी केवळ २ संशयास्पद होत, एकही मृत्यू नाही.
  • २०१५ मध्ये २ लाख ८७ हजार ६७७ रुग्ण तपासले त्यापैकी १ हजार ५६२ संशयास्पद, ५८ मृत्यू झाले
  • २०१६ मध्ये २ लाख ७० हजार ५२९ रुग्ण तप्सले, केवळ १ संशयास्पद, एकही मृत्य नाही.
  • २०१७ मध्ये १ लाख ८० हजार रुग्ण तपासले, पैकी २८० संशयास्पद, १९ मृत्यू.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result