महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ऐतिहासिक स्थळांच्या विकास प्रस्तावांना महिनाभरात मंजुरी देऊ - सामाजिक न्यायमंत्री बडोले मंगळवार, ०७ नोव्हेंबर, २०१७
नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

सांगली :
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या जीवनाशी निगडित सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासासंदर्भातील प्रस्तावांना महिनाभरात मंजुरी देण्यात येईल. तसेच, निवडक दलित वस्ती विकास योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील वाटेगाव, कवलापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मांडकी व रूकडी या गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये मूलभूत पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी महिनाभरात आराखडे सादर करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले.

शासकीय विश्रामगृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील स्थळांचा विकास आणि निवडक दलित वस्ती विकास योजनेमध्ये समाविष्ट गावातील कामांची प्रगती याबाबत आयोजित संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी वि.ना.काळम, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त पी.एस.कवटे, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, कोल्हापूरचे जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, वास्तुविशारद सतीश पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, विविध महामंडळाचे अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात माणगाव येथे छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विकास, तसेच सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावाचा विकास या दोन्ही प्रस्तावांना महिनाभरात मंजुरी देऊ. यासाठी अधिकारी व वास्तुविशारद यांनी समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट करून सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांनी जिल्हा परिषदांचा निधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित विकास योजनेचा निधी विहित वेळेत खर्च करावा. तसेच, पुढील वर्षासाठीचा आराखडा त्वरित सादर करावा, असे निर्देश दिले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळा यांचाही आढावा घेतला. तसेच, 125 व्या जयंतीवर्षानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरज तालुक्यातील आरग येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची प्रगती समाधानकारक सुरू आहे. हे काम पुढील 6 महिन्यात पूर्ण करून लोकार्पण व्हावे, यासाठी गतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result