महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागरिकांच्या सहभागामुळे वृक्ष लागवड मोहीम जनचळवळ बनली - सदाभाऊ खोत शनिवार, ०१ जुलै, २०१७
सांगली : वृक्ष लागवडीची संकल्पना यापूर्वी सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग राबवित असे. परंतु 50 कोटी वृक्ष लागवड संकल्पनेंतर्गत राज्य शासनाने गेली दोन वर्षे या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड जनचळवळ बनली आहे, असे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.

वाळवा तालुक्यातील रेड परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आणि मरळनाथपूर येथे वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कृषि राज्यमंत्री श्री.खोत म्हणाले, गेल्या दोन वर्षात साहित्यिक, कलाकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनात सर्व स्तरातील नागरिकांनी योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित बालचमूने एकच लक्ष चार कोटी वृक्ष, झाडे लावा झाडे जगवा, अशा घोषणांच्या निनादात वृक्षारोपण केले. हे पाहून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समाधान व्यक्त केले. या चिमुरड्या बालमनावर कोवळ्या वयातच वृक्षारोपणाच्या संस्काराचे बीज पेरले गेले असल्याचे ते म्हणाले.

उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा म्हणाले, ही मोहीम 7 जुलै पर्यंत राबविली जाणार आहे. पहिल्या दिवशी 1 लाख 33 हजार 396 झाडे जिल्ह्यात लावण्यात आली. सर्व स्तरातील नागरिकांनी, महिलांनी, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मरळनाथपूर येथील वन विभागाच्या जागेवर 2 हजार 780 झाडे लावण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जांभूळ, चिंच, आंबा व अन्य फळझाडांचे रोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result