महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पांदण रस्त्यांचे भूमिपूजन शनिवार, ०२ फेब्रुवारी, २०१९


यवतमाळ : गावांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते तळेगाव आणि शिवणी (बु.) येथील पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार शैलेश काळे, तळेगावचे सरपंच नितीन मोरघडे, शिवणी (बु.) सरपंच सरीता शिवणकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, पांदण रस्ते हा गावाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जिल्ह्यातील पांदण रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात येत आहे. सुरू करण्यात आलेली कामे त्वरीत पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.

तळेगाव ते कार्ली हा दीड किलोमीटरचा पांदण रस्ता तसेच शिवणी (बु.) ते येरद शिवारापर्यंतच्या दोन किलोमीटर पांदण रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले. यासाठी पालकमंत्र्यांकडून जेसीबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर डिझेलचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी वाकी ते तळेगाव या पांदण रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली. अडीच किलोमीटरच्या या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन ठाकूर, अनिल मंडाळे, दिनेश मंडाळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result