महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
स्वातंत्र्यसैनिक कै. क्रांतिवीर पांडू मास्तरांच्या स्मारक उभारणीला राज्य शासनाची मंजुरी सोमवार, ०९ जानेवारी, २०१७
सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर

सांगली :
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणीचे स्वातंत्र्यसैनिक कै. क्रांतिवीर पांडू मास्तरांचं पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे स्मारक उभारायला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.

कै. पांडु मास्तरांचे स्मारक उभारण्याची मागणी कृषी, फलोत्पादन व पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास खात्याने 2 कोटी 25 लाखांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली आहे. त्याबद्दल श्री. खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.

सन 1927 साली महात्मा गांधी यांच्या विचारांवर प्रभावीत होऊन, क्रांतिवीर पांडू मास्तरांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. सेनापती बापट, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. राजेंद प्रसाद, वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर स्वातंत्र्य संग्रामात कार्यरत राहिलेल्या कै. क्रांतिवीर पांडू मास्तरांच्या स्मारक उभारणीमुळे युवा पिढीला स्फुर्ती मिळेल आणि स्मारकाच्या रुपाने कार्य जीवंत ठेवता येईल, असा आशावादही श्री.खोत यांनी व्यक्त केला. 1942 च्या चलेजाव आंदोलनामध्ये भूमिगत राहून वाळवा तालुक्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीचे काम करत राहिले. 10 सप्टेंबर 1942 ला इस्लामपूर तहसील कचेरीवर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला, त्यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केला होता, त्याचे नेतृत्व पांडू मास्तरांनी केलं होतं.

1942 साली पहिल्यांदा त्यांना येरवड्यात तुरुंगवास भोगावा लागला होता. तिथूनही त्यांनी यशस्वी पलायन केले होते. 1943 साली सातारा, सांगली जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, वसंतदादा पाटील यांच्याबरोबर हरताळ, प्रभातफेरी, भाषणे या माध्यमातून जनजागृती करण्याचेही काम पांडू मास्तरांनी हिरीरीनं केले. पत्री सरकारच्या निर्मितीमध्ये पांडूमास्तरांचा उल्लेखनीय सहभाग होता. वसंतदादांनी 24 जुलै 1943 ला मिरजेचा तुरुंग फोडला, त्यावेळी मिरजेच्या तटावरुन उडी मारुन वसंतदादा ज्या सहकारी मित्रांबरोबर पळाले आणि यशस्वी पलायन केले. अशा थोर महनिय व्यक्तींबरोबरही कै. पांडू मास्तरांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला होता. अशा क्रांतिकारी व्यक्तिचे स्मारक उभारल्यास जिल्ह्याची शोभा वाढेल, असेही श्री. खोत म्हणाले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result