महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दुर्बल घटकांतील रुग्णांच्या उपचारासाठी स्क्रीनवर दिसणार नामांकित रुग्णालयातील बेडची माहिती मंगळवार, ०५ मार्च, २०१९


पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते स्क्रीनचा शुभारंभ

अकोला :
निर्धन व दुर्बल घटकातील दुर्धर आजारांच्या रुग्णांवर उपचारासाठी धर्मदाय न्यासाकडे नोंदणीकृत राज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे, या रुग्णालयांमध्ये सदर घटकांसाठी उपलब्ध बेडची अद्ययावत माहिती मिळण्याकरीता शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये स्क्रीन लावण्यात आली आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

सर्वोपचार रुग्णालयातील सदर स्क्रीनचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, डॉ. अशोक ओळंबे, धर्मदाय उपआयुक्त किशोर मसने, सहायक धर्मदाय आयुक्त शुभांगी नामघाडगे, रुग्ण निरीक्षक ज्योती दांदळे, उज्ज्वला गव्हाळे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरात धर्मदाय न्यासाकडे नोंदणी केलेल्या नामांकित रुग्णालयात निर्धन घटकातील रुग्णांसाठी १० टक्के व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी १० टक्के बेड आरक्षित ठेवले जातात. या सुविधेचा दुर्धर आजारानेग्रस्त रुग्णांना लाभ मिळण्यासाठी या रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत. याची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात टीव्ही स्क्रीन लावण्यात आली आहे. निर्धन रुग्णांसाठी अशा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात तर दुर्बल घटकांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. ही सुविधा प्रथमच आपल्या जिल्हयात राबविण्यात येत आहे. याच लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री यांनी रिमोटच्या साहयाने स्क्रीनचे उदघाटन केले. सदर सुविधाचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीकरीता धर्मदाय उपायुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मसने यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result