महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणी पुरवठा योजनांची ५ टक्के रक्कम भरण्यास शासनाची मान्यता - पालकमंत्री विजय शिवतारे शनिवार, २६ जानेवारी, २०१९
जिल्ह्यातील ६३२ गावांसाठी ८.२३ चा टंचाई आराखडा मंजूर
प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा संपन्न

सातारा :
सातारा जिल्ह्यातील ६३२ गावांसाठी ८.२३ कोटी इतक्या रकमेचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये ५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून माण तालुक्यात सर्वाधिक ४२ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. तसंच टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. ज्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकामुळे बंद आहेत अशा योजनांची ५ टक्के रक्कम टंचाई निधीमधून भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे, याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देताना सांगितली.

येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर मिलींद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचासमावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्हा प्रशासन व लोकसहभागातून चांगले काम झाले आहे. या अभियानांतगत सन 2015-16, 2016-17, 2017-18 व 2018-19 या चार वर्षात अखंड काम सुरु आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 व 2016-17 मध्ये हाती घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे, उपचारांमुळे 17040.24 टिसीएम पाणी साठा उपलब्ध झाला असून विहिंरींच्या पाणी पातळीत 0.50 ते 1.38 मिटरने वाढ झालेली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2018-19 मध्ये शासनाच्या निकषाच्या अधिक राहून 91 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांचे 820 कामांचा आराखडे तयार करण्यात आले आहेत व यातील 414 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्यातील एकूण 26 प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तारळी, धोम, बलकवडी, कुडाळी, मोरणा गुरेघर व वांग 5 प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून 597 कोटी व राज्य शासनाकडून 1935 कोटी असे एकूण 2532 कोटी निधी प्राप्त होणार आहे. यातून 47846 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. नोव्हेंबर 2018 पर्यंत केंद्र शासनाकडून 488 कोटी निधी प्राप्त झाला असून या प्रकल्पांवर 1531 कोटी खर्च झाला आहे. यातून 24073 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 134 कोटी व राज्य शासनाकडून 402 कोटी असे एकूण 536 कोटी निधी प्राप्त होणार आहे. यातून 14816 हेक्टर क्षेत्रास सिचंनाचा लाभ होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मधून 6 हजार 668 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 5 हजार 278 एवढ्या घरांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शबरी आदिवासी योजनेंतर्गत 104 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 66 घरांचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सन 16-17 ते 18-19 मध्ये एकूण 14 हजार 393 एवढे उद्दिष्ट प्राप्त झाले व 13 हजार 928 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 8 हजार 959 एवढ्या घरांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेंतर्गत 88 लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

उरमोडी प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यातील कालवे व उपसा सिंचन योजना, खटाव कालवा व माण कालव्याद्वारे सातारा, खटाव व माण या तालुक्यातील 110 गावातील 27750 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच कायम टंचाईचा भाग असलेल्या उत्तर कोरेगावसाठी वरदायनी असलेली वासना-वांगणा उपसा सिंचन योजना पूर्ण झाली असून या भागातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील 13 रुग्णालयांमध्ये 63 हजार 668 रुग्णांवर एकूण 163 कोटींचे विविध उपचारासाठी शस्त्रक्रीया करण्यात आलेल्या आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आत्तापर्यंत 47 रुग्णांवर 6 लाख 78 हजार 600 इतका विविध उपचार शस्त्रक्रीयांसाठी खर्च करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा 500 खाटांचे रुग्णालय मंजुर झाले असून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाकरिता दि. 22 जून 2018 च्य शासन निर्णयानुसार कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे यांची कृष्णानगर, सातारा येथील 25 एकर जागा विनाअट व विनामुल्य वैद्यकीय शिक्षण विभागास कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. पदनिर्मिती आणि रुग्णालय हस्तांराबाबत शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल. जिल्हा रुग्णालय, सातारा येथे डायलिसिस विभाग कार्यरत असून मोठ्या प्रमाणात रुग्णांना सुविधा पुरवली जात आहे. या विभागासाठी अजून दोन जादा मशीन पुरवण्यात आलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 3 शस्त्रक्रीयागृहांचे नुतनीकरण करण्यात येत असून महिनाअखेर हे काम पूर्ण होईल, जेणेकरुन रुग्णांना अद्यावत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळतील.

कोयना धरणामध्ये विस्थापीत झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित आहे. त्याबाबत वेळोवेळी बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते. परंतू अद्यापपर्यंत कोयना धरणग्रस्तांचे 100 टक्के पुनर्वसन झालेले नसल्यामुळे कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात वेगवान सोडवणूक आणि विकसनशिल पुनर्वसन प्रक्रिीया वेगवान होण्यासाठी अपर मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. कोयना प्रकल्पांतर्गत पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यातील निवाड्यांची डाटा एंट्री एजन्सीमार्फत करण्यात आली आहे. संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत तपासणी करुन चावडी वाचन करण्यात आले असून लवकरच संकलन रजिस्टर अद्यावत करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये महसूल विभागामार्फत चालू वर्षी एकूण 77 नवीन तलाठी सज्जांची, 12 नवीन महसूल मंडलांची व 13 नवीन महसुली गावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यात चालू वर्षी 133 आपले सरकार सेवा केंद्रांची निर्मिती महसूल विभागातर्फे करण्यात आलेली असून शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 25 हजार 205 पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना 50,49,689 व संबंधित संस्थांना 3,18,90,434 अशी एकूण 3,69,40,123 रुपये वाटप करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील खंबाटकी घाट परिसरातील नवीन सहा मार्गिका बोगदा (३ मार्गिका जुळे बोगदे) पोहोच रस्त्यासहित तसेच हेळवाक ते कराड सेक्शन व सातारा ते म्हसवड सेक्शनच्या दुपदरीकरण या कामांचा शुभारंभ मागील महिन्यात करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन विकासाला नवी चालणा मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. खंबाटकी घाटातील बोगद्याच्या नव्या सहा मार्गिकेमुळे अपघात प्रवणक्षेत्रात होणाऱ्या अपघातात मोठी घट होईल. शिवाय प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सचुनेनुसार याही वर्षी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पधरवड्यात लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी मी प्रयत्नशील राहील. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. त्यातून आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘विकास वाटा’ या घडी पुस्तिकेचे प्रकाशन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्याच्या विकास कामांवर आधारित "विकास वाटा" ही घडीपुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या घडीपुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या घडीपुस्तिकेमध्ये विविध विभागांनी केलेल्या कामकाजाची माहिती देण्यात आलेली आहे.

माहिती कार्यालयातील विष्णू शिंदे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णू शिंदे यांचा पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्री. शिंदे हे गेली 15 वर्ष चित्रीकरणाचे काम करत आहेत. त्यांनी वेळोवेळी केलेल्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट चित्रिकरणासाठी विशेष गौरव करण्यात आला.

विविध पुरस्कारांचे वितरण
कै. प्रथमेश विजय वाडकर यास मरणोत्तर बालशौर्य पुरस्कार – 2019 प्रदान करण्यात आला. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मोहन घोरपडे, सहा. पो. फौजदार, पुरुषोत्तम देशपांडे सहा.पो. फौजदार यांना राष्ट्रपती पदक तर संतोष चौधरी सपोनि, गजानन कदम सपोनी यांना विशेष सेवेबद्दल पदकाने गौरविण्यात आले. तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार जिल्ह्यातील एकूण 11 ग्रामपंचायतींना देण्यात आला. सन 2017-18 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धेतील प्रथम तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आला. तर सन 2017-18 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत्‍ स्वच्छ ग्राम सपर्धेतील 3 ग्रामपंचायतींना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. लघु उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजकांना, उच्च शिक्षण विभागाअंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विविध लोकशाही पंधरवडा 2019 निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

आकर्षक संचलन
यावेळी कन्याशाळा राजपथ, सातारा यांनी प्लॅग मार्चीग केले. विविध विभागांचे चित्ररथ, दिमाखदार परेड, कन्या शाळा, कन्या विद्यालय, सुशिला देवी साळुंखे हायस्कूल, सह्याद्री विद्यालय, श्री भवानी विद्यामंदिर,महाराजा सयाजीराव विद्यालय, पॅरेन्ट स्कूल, सातारा यांनी सादर केलेले लेझीम झांज पथकाची प्रात्यक्षिके, श्रीपतराव पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. परेड संचलनात विविधपथकांनी दिमाखदार संचलन केले. यामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, पोलीस बॅण्ड पथक, सैनिक स्कूल, आरएसपी, विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता.


खेलो इंडिया युथ गेम्समध्ये उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार
पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सातारा जिल्ह्यातील उत्तम कामगिरी केलेल्या सुदेष्णा शिवनकर, मैदानी खेळ, आर्या देशपांडे बॅडमिंटन, तन्वी तांबोळी ज्युदो, वैष्णवी पवार वेटलिफ्टींग, आर्यन वर्णेकर जलतरण, स्नेहा जाधव मैदानी, मयुरी देवरे वेटलिफ्टींग, आरती पानस्कर व्हॉलीबॉल, कल्याणी वरेकर व्हॉलीबॉल, सोनाली हेळवी कबड्डी व यश मर्ढेकर फुटबॉल या खेळाडूंचा पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result