महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
क्रीडा क्षेत्राला नियोजन समितीतून अधिकची तरतूद- चंद्रकांत पाटील सोमवार, ०४ मार्च, २०१९


शेतकऱ्यांना लवकरच घरबसल्या डीजिटल सातबारा

कोल्हापूर
: कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला तसेच खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून क्रीडा क्षेत्रासाठी अधिकची तरतूद केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित केलेल्या शिवछत्रपती राज्य पुरस्कारार्थी खेळाडू तसेच खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन गिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे आदी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. पाटील म्हणाले, खेळ व क्रीडा क्षेत्राला आवश्यकतेनुसार पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. गुणवंत खेळाडूंच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांना आवश्यक सर्व सहकार्य आणि मदत करण्यात यापुढेही सक्रीय राहू. कोल्हापूर जिल्ह्याला खेळाची फार मोठी परंपरा असून ही गौरवशाली परंपरा जोपासून ती वृद्धिंगत करण्यासाठी शासन आवश्यक सर्वती मदत करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शासनाने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली असून खेळाडूसाठी बक्षिसाची रक्कमही वाढविली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धात पदके मिळविणाऱ्या खेळाडूना शासकीय सेवेत थेट निुयक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक गुणवंत खेळाडूंच्या शासकीय सेवेत नियुक्त्या झाल्या आहेत. नुकतीच 32 जणांची यादी जाहीर केल्याचेही ते म्हणाले.

कोल्हापुरातील एकही खेळाडू पैसे नाहीत म्हणून खेळ-क्रीडा क्षेत्रापासून वंचित राहणार नाही, यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही देऊन श्री.पाटील म्हणाले की, आगामी ऑलंपिक, पॅरा ऑलंपिक तसेच युवा ऑलंपिकमध्ये जिल्ह्यातील किमान 12 जण सहभागी होऊन यशस्वी होतील, यामध्ये आणखी खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये सहभागी होऊन पदक प्राप्त करावीत, असे आवाहनही त्यांनी केले. या खेळाडूंना सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन दिली जाईल.

शेतकऱ्यांना लवकरच घरबसल्या डीजिटल सातबारा

राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच डीजिटल स्वाक्षरीसह 7/12 देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात दोन ते अडीच कोटी 7/12 संगणकीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु असून यासाठी तलाठ्यांना लॅपटॉप देण्याची प्रक्रीयाही गतीमान केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले असून लवकरच शेतकऱ्यांना घरबसल्या डीजिटल सातबारा उपलब्ध होईल.

श्री.देसाई म्हणाले की, कोल्हापूरच्या गौरवशाली क्रीडा परंपरेला प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाची असून विभागीय क्रीडा संकुलातील स्विमिंग टॅकसह अन्य उपक्रम सुरु करण्यास प्रशासनाचे प्राधान्य राहील. जिल्ह्यात डिजिटल 7/12 चे काम अंतिम टप्यात असून लवकरच हे काम पूर्ण होईल. जिल्ह्यातील सर्वच तलाठ्यांना आता लॅपटॉप उपलब्ध करुन दिल्याने तलाठ्यांचे काम अधिक गतीमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्री.साखरे यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result