महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा निवडणूक : सोशल मीडियावर सायबर सेलची करडी नजर शुक्रवार, १५ मार्च, २०१९
पेड न्युजसाठी विशेष समिती

चंद्रपूर :
चंद्रपूर लोकसभा मतदार संघ निवडणूक काळात सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक व्हावा, तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, या दृष्टीने सोशल मीडियावर पोस्ट‍ होणाऱ्या मजकुरावर पोलीस विभागाच्या सायबर सेलची करडी नजर ठेवून आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

युवकांनी आपले करिअर धोक्यात न घालता कोणत्याही वादग्रस्त पोस्ट पाठवणे, तयार करणे यापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी फेसबुक, व्हॉट्सॲप, व्टिटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईट वर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशिर आहे. नागरिकांनी अशा पोस्ट व्हायरल अथवा शेअर करु नये. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. युवकांनी निवडणुकीच्या काळात अशा पोस्ट पाठवणे, फॉरवर्ड करणे, त्यावर प्रतिक्रिया देणे टाळावे असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास जबर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

स्मार्ट फोनच्या माध्यमातून प्रत्येकजन सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. दिवसभरात फेसबुक, व्हॉट्सॲप, व्टिटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईट मीडियावर असंख्य संदेश प्राप्त होत असतात. अनेकवेळा हे संदेश न वाचता व खातरजमा न करता फारवर्ड केले जातात. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्यामुळे आपल्याला येणारे मॅसेज काळजीपूर्वक वाचून खातरजमा करुनच पुढे पाठवावे. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, महिलांची, राजकीय व्यक्तींची प्रतिमा मलिन करणारे मॅसेज फारवर्ड करु नये. असे आवाहन यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीने केले आहे.

लोकसभेची निवडणूक असल्यामुळे सोशल मीडियावर पोलीस विभागाचे सायबर सेल करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आपल्या हातून चुकीचा मॅसेज जावू नये याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. सध्या फेसबुक व व्हॉट्सॲपवर विविध राजकीय प्रचाराच्या पोस्ट मोठया प्रमाणात टाकल्या जात आहेत. या मजकुराला सायबर सेल मॉनिटरींग करीत आहे. ही बाब पोस्ट टाकणाऱ्यांनी लक्षात ठेवावी. कोणाचाही अनादर होणार नाही. जातीय तेढ होणार नाही, महिलांची बदनामी होणार नाही. ही काळजी घेण्याची जबाबदारी मजकुर टाकणाऱ्याची व शेअर करणाऱ्याची असणार आहे. अनावधानाने सुध्दा अशा पोस्ट लाईक किंवा शेअर करु नये, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

निवडणूक काळात वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील पेड न्यूज आणि जाहिरातीचे सूक्ष्मपणे सनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पेड न्यूज व जाहिरातीच्या खर्चाचा अहवाल नियमित निवडणूक खर्च कक्षाला देण्यात येणार आहे. कुठल्याही समुहावर किंवा घटकावर एखाद्या उमेदवाराचा प्रभाव टाकणारे वृत्त हे पेड न्यूजच्या कक्षेत येते. अशा बातम्यांना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमार्फत नियंत्रित केले जाणार आहे.

पोलीस विभागात ९७६७२११६११ क्रमांकावर तक्रार करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
आदर्श आचारसंहितेचे पालन करताना मोबाईलवरील एसएमएसद्वारे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने केले आहे.पोलिस विभागाला या संदर्भातील निर्देश देण्यात आले असून पोलीस विभागाने एसएमएस सेवेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे संकेत दिले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने या संदर्भात एक मोबाईल नंबर जनहितार्थ जारी केला आहे. ९७६७२११६११ असा हा मोबाईल क्रमांकावर आक्षेपार्ह एसएमएस किंवा कोणत्याही मोबाईल वरील मेसेज संदर्भात तक्रार करता येते. आपल्याला आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला या क्रमांकावर फॉरवर्ड केल्यास पोलिस विभागातर्फे या मॅसेजची तपासणी होऊ शकते. आचारसंहितेच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या आक्षेपार्ह मेसेजसाठी वरील सुविधेचा वापर करावा, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result