महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एटापल्ली अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना अधिकाधिक मदत मिळवून देणार - पालकमंत्री गुरुवार, १७ जानेवारी, २०१९


गडचिरोली :
एटापल्ली येथील अपघातात मरण पावलेल्या मृतकांच्या नातेवाईकांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव यांनी दिले. यानंतर येथील मृतकांचे नातेवाईक व परिसरातील संतप्त नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

एटापल्ली तालुक्यात गुरुपल्ली गावानजिक सुरजागड येथील लोहप्रकल्पातून खनिज वाहतूक करणारा एक ट्रक आणि एस.टी.बस यांची धडक होऊन काल झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागातील संतप्त नागरिकांनी लॉयडस् मेटल या कंपनीचे १५ ट्रक जाळले, या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांनी मुंबईहून तातडीने येथे येत मृतकांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

पालकमंत्र्यासमवेत यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, तसेच पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे देखील होते. यावेळी या भागातील स्थानीक नेते माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार सभापती भाग्यश्री आत्राम आदींचीही उपस्थिती होती.

यावेळी संतप्त जमावाच्या भावना पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या. अपघातातील मृतांना एस.टी. महामंडळातर्फे मिळणाऱ्या मदतीव्यतिरिक्त लॉयडस् मेटलतर्फे अधिकाधिक मदत मिळवून देऊ असे त्यांनी यावेळी सांगितल्यानंतर जमावाचा रोष शांत झाला. यावेळी अपघातात मरण पावलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result